साळवण : ते वर्षानुवर्षे करत असलेले व्यवसाय कालबाह्य झाले. रोजगाराच्या संधीमुळे त्यांना शहर खुणावत होते. एकापाठोपाठ एक असे सारेच शहरात दाखल झाल्याने सारा वाडा ओस पडला होता. भयाण शांततेमुळे वाड्याला अक्षरक्षः अवकळा आली. कोरोना नावाचं वादळ घोंघावत आलं. शहरातील गर्दीत रोगाची धास्ती आणि बंद काळात रोजीरोटीचा प्रश्न यामुळे "गडया आपला गाव बरा' म्हणत त्यांनी पुन्हा वाडा गाठला आणि दोन दशके ओस पडलेला कावळटेकचा धनगरवाडा पुन्हा गजबजून गेला.
कोरोना विषाणूने जगाला जमिनीवर आणल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
गगनबावडा तालुक्यात धुंदवडे ते अणदूर दरम्यानच्या पठारावरील घनदाट झाडीत कावळटेकचा धनगरवाडा वसला आहे. डोंगरदऱ्यातील रानमेवा व वाळलेली लाकडे जवळपासच्या वाड्या वस्त्यात विकायची आणि दोन वेळच्या जेवणाची तजवीज करायची. हा त्यांचा दिनक्रम. कालांतराने या व्यवसायावर संक्रांत आली. त्यामुळे नवीन संधीचा शोध सुरू झाला आणि एकापाठोपाठ एकाने कोल्हापूर गाठले. शहराच्या एका उपनगरात त्यांची वसाहतच झाली आहे. इकडे तीसपस्तीस कुटुंबातील केवळ दोन-चार कुटुंबेच वाड्यावर राहिली.
महिनाभरापूर्वी कोरोनाची साथ आली. धनगर बांधवांत चलबिचल झाली. शहरातील गर्दीतील संभाव्य धोक्याची जाणीव झाली. संचारबंदीमुळे त्यांचा रोजगार थांबणार होता. शहरात थांबून खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पुन्हा त्यांना वाड्यावरचे दिवस आठवू लागले. "गड्या आपला गांव बरा' म्हणत सर्वांनी पुन्हा वाडा गाठला. सर्वांनी इथल्या अर्धवट पडलेल्या घरांना काठयांचा आधार देत संसार थाटला. गेली दोन दशके ओस पडलेला वाडा पुन्हा गजबजला. शहरी माहोलाची झूल बाजूला ठेवून धनगर बांधव महिनाभर वाड्यावर गुण्यागोविंदाने राहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.