यंदा पुरवठा होणाऱ्या पाण्याची पातळी मुबलक असल्याने यामध्ये हरभरा, कांदा पिकाची भर पडणार असल्याचे कृषी सहाय्यकांचे मत आहे.
कंदलगाव : कंदलगाव येथील शेतकऱ्यांची जीवनदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या तलावाबरोबरच परिसरातील विहिरींचा पाणीसाठा मुबलक असल्याने याचा फायदा पुढील काळात रब्बी पिकांसाठी होणार आहे. यंदा कंदलगाव व गोकुळ शिरगाव परिसरातील रब्बीचा हंगाम जोमात येणार आहे.
१.७१ द.ल.घ.मी. पाणीसाठा असणाऱ्या तलावाच्या पाणी वाटपावर ५६० हेक्टर जमिनीतील पिकांना रब्बी हंगामात पाणीपुरवठा होत असतो. या पाण्यावर शाळू, सूर्यफुल, गहू, भाजीपाला, फुलशेती हंगामात घेतली जाते. यंदा पुरवठा होणाऱ्या पाण्याची पातळी मुबलक असल्याने यामध्ये हरभरा, कांदा पिकाची भर पडणार असल्याचे कृषी सहाय्यकांचे मत आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने मधल्या काळातही पाण्याची कमतरता भासली नाही. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या काळात होणारा पाण्याचा उपसा थांबल्याने तलाव, विहिरीत १०० टक्के साठा शिल्लक आहे. वर्षापूर्वी पावसाचे प्रमाण अनियमित असल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरी उन्हाच्या तडाख्यामुळे पाणी उपशावर मोठा ताण पडत होता. त्यामुळे अनेकदा जेमतेम पाण्यावर गावचा पिण्याचा प्रश्न व पाणी बचतीतून पिके घेण्याचे वास्तव होते; मात्र यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने ४४८ हेक्टर पूर्ण क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
कालवा गळतीचा तोटा..
कंदलगावातून कणेरी गावच्या हद्दीपर्यंत सुमारे ७ कि.मी. अंतरावर कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. या कालव्याला अनेक ठिकाणी गळती असल्याने पाणी शेतीला कमी आणि ओढ्याने जास्त वाहत असते. या वाया जाणाऱ्या पाण्याचा मात्र साठ्यात तोटा होत आहे.
"यंदा पावसाचे प्रमाण योग्य असल्याने अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शेतीला ओढ पडली नाही. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी पावसाच्या सरी कोसळत असल्याने तलाव, विहिरीत पाण्याचा मुबलक साठा आहे. या साठ्यावरच रब्बी हंगाम जोमात होण्याची शक्यता आहे."
- नामदेव गिरी, कृषी सहाय्यक.
"तलावातील पाण्याच्या वापराबद्दल अतिरेकपणा होत आहे. पाणी बचतीला महत्त्व देऊन गळती थांबवावी. वाया जाणाऱ्या पाण्याचा कोणालाही उपयोग होत नाही."
- उत्तम पाटील, सदस्य, दक्षता समिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.