कंदलगाव.सासने कॉलनीतील महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे महिला संतापल्या.
08985
पाण्यासाठी महिला रस्त्यावर
सासने कॉलनीत रास्ता रोको; तासभर वाहतूक खोळंबली
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २१ : कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून आयटीआयजवळील सासने कॉलनीत होणारा पाणीपुरवठा गढूळ व दुर्गंधीयुक्त होत असल्याने आठवड्यापासून वारंवार माहिती देऊनही सुधारणा होत नसल्याने आज सायंकाळी स्थानिक महिलांनी मुख्य रस्त्यावर उतरून रास्ता रोको अंदोलन केले. जवळपास तासभर केलेल्या आंदोलनाने निर्माण चौक ते रामानंदनगरच्या दरम्यानची वाहतूक बंद झाली.
सासने कॉलनीत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये जनावरांचे मलमूत्र तसेच इतर दूषित पाणी मिसळत होते. त्याच पाण्याचा पुरवठा घरात होत होता. त्याला दुर्गंधी येत होती. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिकेचे कर्मचारी दखल घेत नव्हते. आज सकाळी काही कर्मचारी आले व फुटलेली पाईपलाईन पाहून निघून गेले. दुरुस्तीबाबत काहीच सांगितले नसल्याने संतापलेल्या महिलांनी निर्माण चौकाकडून रामानंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सासने कॉलनीनजीक अचानक रास्ता रोको केला. दीड तास आंदोलन रस्त्यावर सुरू असूनही अधिकारी फिरकले नव्हते. या आंदोलनात मीनाक्षी आमते, सविता जाधव, यशोदा गायकवाड, उषा जाधव, वर्षा चव्हाण, सोनल शेळके यांच्यासह कॉलनीतील महिला व नागरिक सहभागी झाले होते.
चौकट.
नेहमीच पाण्याची समस्या
आयटीआय परिसरात पाणी गळती समस्या नेहमीचीच आहे. आठवड्यापासून समस्येत गढूळ पाण्याची तक्रार वाढली आहे. वारंवार माहिती देऊनही अधिकारी, कर्मचारी दखल घेत नाहीत. त्यामुळे भागात पाण्याची समस्या पुन्हा भेडसावत आहे.
कोट.
आमच्या कॉलनीत पाण्यासाठी नेहमीच तक्रार आहे. कधी गळती तर कधी गढूळ पाण्यामुळे त्रास सुरू आहे. अधिकाऱ्यांना सांगूनही दखल घेत नाहीत. दोन दिवसांत यामध्ये सुधारणा न झाल्यास पुन्हा आंदोलन करू.
- अश्विनी वास्कर, महिला
घरामध्ये लहान मुले आहेत. पाऊस सुरूच आहे. डास, माशांचेही प्रमाण वाढले आहे. त्यातच गढूळ पाण्यामुळे पुन्हा आजारपण वाढत आहे.
- नीलम पोतदार, महिला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.