हर दिवार कुछ केहती है ... (प्रॉपर्टी पुरवणी लेख)

हर दिवार कुछ केहती है ... (प्रॉपर्टी पुरवणी लेख)

Published on

हर दिवार कुछ कहती है...
रंग आणि आकारात मानवी जीवनाचं प्रतिबिंब दिसतं. म्हणूनच आपण प्राचीन गुहा, मंदिरं यावरची शिल्पे, चित्रांबरोबर तादात्म्य पावतो. शिल्प, चित्रं हा कला प्रकार पिढ्यांपिढ्या आपल्याकडे प्रवाही आहे. आता आलिशान घरांच्या भिंतीही या पारंपरिक विचाराने व्यापल्या आहेत. या भिंतींवरील आकृत्या, कॅलिग्राफी किंवा ॲक्रॅलिकमधील चित्र एक विचार मांडत असतात. त्या चित्राने ती निर्जीव भिंतही बोलू लागते.
- प्रतिनिधी

कोणत्याही घराला रंग लागल्याशिवाय त्यामध्ये जिवंतपणा येत नाही. त्यामुळेच घराला रंग देताना चोखंदळपणे निवड केली जाते. इंटिरिअर डिझाइन ही व्यवस्था उदयाला येण्या आधीपासून आपल्याकडे घराचे अंतर्गत रंग कलाकुसरीने दिले जात आहेत. सध्या तर वॉल पेंटिंग या संकल्पनेने इंटिरिअर डिझाइनचे रूपच पालटून गेले आहे. घरातील ड्रॉइंग रूम, किचन किंवा हॉल यामध्ये एक भिंत अशी असते की ज्यावर केवळ रंग न देता विशिष्ट चित्र काढलेले असते. ज्यावेळी व्यक्ती या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी पहिल्यांदा त्या चित्राकडे लक्ष जाते. हे चित्र केवळ शोभा म्हणून रेखाटलेले नसते, तर त्यामध्ये एक विचार डोकावत असतो. एखादा संदेश दिलेला असतो. हा संदेश त्या ठिकाणी जे काम चालते त्याला साजेसा असतो. हॉटेल, कॉर्पोरेट ऑफिसेस अशा ठिकाणी वॉल पेंटिंग अधिक केलेले दिसते. या पेंटिंगमध्ये अनेक विषय असतात. कधी एखादा पौराणिक प्रसंग रेखाटलेला असतो, तर कधी निसर्ग सौंदर्याची अनुभूती देणारे चित्र काढलेले असते. काही वेळा व्यक्तिचित्रही असते. त्यामुळे त्या घराला शोभा येते. अशा प्रकारे चित्र काढणारे चित्रकारही आहेत. त्यांना या वॉलपेंटिंग करण्याचे काँट्रॅक्ट दिले जाते. रियाज शेख, आदित्यचारी, मकबूल फिदा हुसेन असे काही नामंवत वॉल पेंटर आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहात काढलेल्या वॉलपेंटिंगमधून कोल्हापूरची कला संस्कृती दिसते. तसेच कोल्हापुरातील शाहूकालीन वास्तूही येथे दिसतात. या वॉल पेंटिंग्समुळे या नाट्यगृहाची शोभा केवळ वाढलीच नाही, तर येथे येणाऱ्या प्रेक्षकांना कोल्हापूरच्या कलासक्त मनांची जाणीव होते.
वॉल पेंटिंग बरोबरच आता भिंतीवर शिल्पे साकारण्याचा ट्रेंडही वाढला आहे. येथील शाहू स्मारक भवनच्या आवारात राजर्षी शाहू यांच्या कार्याची महती सांगणारे शिल्प भिंतीवर साकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालतान राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेल्या लोकोपयोगी निर्यणांचे शिल्प भिंवरच बनवले आहे. या शिल्पांमुळे त्या दालनाची, वास्तूची आशयघनता वाढली. सध्या पंचतारांकित हॉटेल्स, मोठी कला दालने येथे अशा पद्धतीची शिल्पे पहायला मिळतात. काही शिल्पे आलिशान घरे, पेंटहाउस, फार्म हाउस यांची शोभा वाढवतात. अशा पद्धतीची शिल्पे बनवणारे कलाकारही आहेत. आपल्या इच्छेप्रमाणे ते ही शिल्पे बनवून देतात. मात्र, अद्याप आपल्याकडे सर्वचजण कलेकडे आदराने पहातातच असे नाही. त्यामुळे या कलाकारांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे पूर्णवेळ अशा पद्धतीची शिल्पे करणारे कलाकार कमी आहेत.
नवीन घरांमध्ये वॉल पेंटिंग किंवा शिल्पे करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. यामध्ये किचन किंवा बेडरूमध्ये छताला पीओपी माध्यमातून विविध थिमचे आकर्षक डोकोरेशन केलेले असते. यामध्ये तारांगण, समुद्रातील जलचर अशा विविध संकल्पना साकारलेल्या असतात. भिंतीवर कॅलिग्राफीही केलेली असते. विविध प्रकारचे श्लोक, सुविचार, थोरामोठ्यांची वचनेही भिंतीवर कोरली जातात. त्यामुळे खऱ्या अर्थाने या भिंतींना अर्थ प्राप्त होतो.
खरे तर एखाद्या वास्तूमध्ये चित्र, शिल्प रेखाटणे ही आपली प्राचीन पद्धत आहे. अंजठा वेरूळच्या लेणी असतील किंवा विविध मंदिरे असतील येथे चित्र आणि शिल्प असतात. इथे येणाऱ्या प्रत्येकाला ती केवळ आनंद देत नाहीत, तर एक विचारही देत असतात. अर्थात हा विचार समजावून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कलासक्त मन आणि दृष्टिकोन आवश्यक आहे. वारली चित्रकलाही याचे उत्तम उदाहरण आहे. वारली चित्रे साध्या कुडाच्या घरालाही सुंदर बनवतात. वारली समाजाचे जगणे मांडणारी शिल्पे आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासाचा विषय बनली आहेत. इंटिरिअर डिझाईन ही संकल्पना रुजून तशी दोन दशके उलटली आहेत. घरातील एखादा कोपरा एखादी वस्तू, शिल्प ठेवल्याने उठून दिसतो. एखादी विशिष्ट आकाराची कुंडी त्या परिसरात वावरणाऱ्यांना प्रसन्न करते. अशाच पद्धतीने भिंतीवर लावलेले शिल्प किंवा चित्र तेथून जाणाऱ्या-येणाऱ्याच्या मनात घर करून राहते. वॉल पेंटिंग करणाऱ्या चित्रकारांनी आपल्या प्रतिभेतून एक कला प्रकार प्रवाही ठेवला आहे. काळाच्या ओघात त्यामध्ये जरी नवनवीन प्रकार आले तरी घराला घरपण देणारी ही कला आहे. भिंतीवर रेखाटलेली चित्रे, शिल्पे या भिंतीला बोलते करतात. म्हणूनच हर दिवार कुछ कहती है....

----------------------------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.