Indian Sword Dandpatta
Indian Sword Dandpattaesakal

पट्टा की दांडपट्टा? तज्ज्ञांकडून स्पष्टतेचा आग्रह; शासनाने 'दांडपट्टा' शस्त्राला दिला राज्यशस्त्राचा दर्जा

‘पट्टा’ हा एक तलवारीचा प्रकार असल्याचा उल्लेख जुन्या ग्रंथांत आढळतो.
Published on
Summary

अलीकडच्या काळात युद्धकलेच्या स्पर्धेत दांड व पट्टा फेक प्रकाराचा समावेश केला जातो. त्यामध्ये खेळाडू उजव्या हातात पट्टा व डाव्या हातात दांड घेऊन डाव्या पवित्र्यात उभा राहतो.

कोल्हापूर : युगपुरुष, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘पट्टा’ हे आवडते शस्त्र. तसा उल्लेख इतिहास संशोधक, अभ्यासक करतात. शस्त्र अभ्यासकांच्या मते ‘दांड’ व ‘पट्टा’ ही दोन वेगवेगळी शस्त्रे आहेत. ‘पट्टा’ हा एक तलवारीचा प्रकार असल्याचा उल्लेख जुन्या ग्रंथांत आढळतो. शिवकालीन कागदपत्रांत ‘पट्टा’ अशीच नोंद मिळते. शासनाकडून ‘दांडपट्टा’ शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा दिल्याची घोषणा शिवजयंती दिवशी झाली. या निर्णयाचे महाराष्ट्रवासीयांना कौतुक असून, त्यांची छाती अभिमानाने फुलली आहे. दांड म्हणजे एक हाती काठी किंवा काठीस अग्रणी लावलेले पोलादी फळ आणि पट्टा म्हणजे धातूची सरळ पट्टी. अशी दोन वेगवेगळी शस्त्रे आहेत. त्यामुळे त्यात स्पष्टता यावी, इतकीच जाणकारांची अपेक्षा आहे.

पट्टिश: पुंप्रमाणे स्वात द्विधार :
तीक्ष्णशृंगक : !!
हस्तत्राणसमायुक्तो मुष्टि: खड्ग :
सहोदर : !! (वैशंपायन)

पट्ट्याचा आकार तलवारीसारखाच असतो. हा मनुष्याइतका लांब असतो. याला दोन्ही बाजूंनी धार असते. याचा पुढचा भाग फार तेज असतो. तो पकडण्यासाठी जी मूठ असते, तिला ‘खोपडा’ म्हणतात. यात हाताचा पंजा व मनगट यांचे चांगले रक्षण होते. बडोद्याचे शस्त्र अभ्यासक दत्तात्रय मुजुमदार लिखित व्यायामज्ञानकोश खंड दुसरामध्ये ‘पट्टा’ शस्त्राविषयी असलेल्या संस्कृत श्‍लोकाचा हा अर्थ. ते महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिद्ध पट्टेगीर म्हणून पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे व भाऊसाहेब पेशवे असल्याचे सांगतात. पुढे पुरुष उंचीचा पट्टा जयपूरला असून, हत्तीच्या सोंडेत पट्टा देऊन त्यालाही लढवितात, असे स्पष्ट करतात. पट्टा हे शस्त्र महाराष्ट्रवासीयांना परिचित आहे. ज्यांच्या पूर्वजांनी युद्धात पराक्रम केला, त्यांच्या वाड्यात विविध शस्त्रे पाहायला मिळतात. त्यात ‘पट्टा’ शस्त्र आवर्जुन आढळते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात कोल्हापूर संस्थानात मर्दानी खेळ अर्थात शिवकालीन युद्धकलेच्या स्पर्धा व्हायच्या. त्यात एक हाती पट्टा, दुहाती पट्टा फेक सादर करून खेळाडू गुण मिळवायचे. पवित्रा, नजर, सफाईदारपणा, आवेश यावर गुणांकन केले जायचे.

Indian Sword Dandpatta
शाहू महाराजांबाबत सर्व सकारात्मक? पवारांची डिनर डिप्लोमसी, सतेज पाटलांच्या घरी जमली नेत्यांची मांदियाळी

सहा भागांचा वैशिष्ट्यपूर्ण पट्टा...

पट्ट्याच्या मुठीला खोपडा, खोबळा किंवा खोगळा असे म्हटले जाते. चिमटा, पाते, कडी, गज, घाट (मूठ) व पाते अशा सहा भागांनी तो जोडला जातो. शस्त्र फिरविण्याचे शास्त्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. खोगळ्याच्या आतील बाजूस असलेल्या कठीत उजव्या हाताच्या बोटांची मजबूत पकड करून तो धरला जातो. डाव्या हातात ढाल धरून पवित्रा घेतला जातो. खांद्याच्या सरळ रेषेत आडव्या पद्धतीने पट्टा फिरवला जातो. तो फिरवत असताना शत्रू धारदार पात्यामुळे जवळ येणे शक्य नसते. शीर, गर्दन, जनोई, खोच, कडक असे पट्ट्याचे वार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अकोला, नवी मुंबई, ठाणे, घाटकोपर (मुंबई), सोलापूर, नाशिकसह ग्रामीण भागात या कलेचे अस्तित्व आजही टिकून आहे. तेथील आखाड्यांत पट्ट्यासह तलवार, जांबिया, बाणा, भाला, विटा शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते.

शिवरायांच्या पट्ट्याचे नाव ‘यशवंत’


पन्हाळा-विशाळगड युद्धात खासे शिवराय एक हाती पट्टा व एक हाती तलवार घेऊन लढले होते. प्रतापगडाच्या युद्धात शिवरायांचा हुद्देदार जिवा महाला यांच्याकडे शिवरायांचा पट्टा होता. त्या पट्ट्याने सय्यद बंडाचे शीर कलम झाले होते. शिवरायांच्या तलवारींना जगदंबा, तुळजा, भवानी अशी नावे होती, तसे पट्ट्यास ‘यशवंत’ हे नाव होते. रामचंद्र पंत अमात्य यांना छत्रपती शिवरायांनी पट्टा भेट दिल्याचा उल्लेख अमात्य दप्तरात सापडतो. शस्त्र अभ्यासक संदीप सावंत म्हणतात, ‘‘ज्ञानेश्‍वरीच्या अकराव्या ओवीत ज्ञानोबांनी ‘कोलुकाठी’ असा एका शस्त्राचा नामोल्लेख केला आहे. ‘कोलू’ हा कन्नड शब्द असून, त्याचा अर्थ धातूची सरळ पट्टी असा होतो. काठी या शब्दाचा अर्थ लाठी. हा शब्द एकत्रित असल्याने एक हाती कोली व एक हाती लाठी असा अर्थ घेतल्यास युद्धकलेनुसार पट्टा बनाटी, दांड पट्टा असा असा अर्थ होईल. म्हणजे ही दोन्ही शस्त्रे वेगवेगळी म्हणावी लागतील. तसेच पंधराव्या ओवीत ‘खड्‌गलता’ असा शब्द आला आहे. ‘खड्ग’ या शब्दाचा अर्थ ‘तलवार’ व लता म्हणजे ‘लवचिकता’. ज्याचे पान (पाते) लवचिक असते, त्यास आपण ‘पट्टा’ म्हणतो. संत तुकाराम महाराजांनी ‘पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, लागो नेंदू अंगा पापपुण्य,’ असे म्हटले आहे. याचा अर्थ अंगाभोवती पट्टे फिरवत शत्रूस जवळ येऊ न देणे, असा होतो. विजापूरच्या आदिलशहाच्या काळात ‘नुजुम-अल-उलम’ ग्रंथात एक योद्धा पट्टा शस्त्र हाती घेऊन उभा आहे व त्या शस्त्रास ‘तप्पश’ असे म्हटले आहे.’’

Indian Sword Dandpatta
RSS, भाजपचा पराभव करणे हीच गोविंद पानसरेंना खरी श्रद्धांजली ठरेल; 'कम्युनिस्ट'च्या सरचिटणीसांचा निशाणा

‘दांड’ शब्द बाराव्या शतकापासून प्रचलित

अलीकडच्या काळात युद्धकलेच्या स्पर्धेत दांड व पट्टा फेक प्रकाराचा समावेश केला जातो. त्यामध्ये खेळाडू उजव्या हातात पट्टा व डाव्या हातात दांड घेऊन डाव्या पवित्र्यात उभा राहतो. दोन्ही शस्त्रांचा मिलाफ साधून फेक सादर केली जाते. या प्रकारातही पवित्रा, नजर, आवेश, सफाईदारपणा यावर गुणांकन केले जाते. पुण्यातील शस्त्र व युद्धकला अभ्यासक रवींद्र जगदाळे म्हणाले, ‘‘दांड हा शब्द बोलीभाषेत बाराव्या शतकापासून प्रचलित आहे. तो दंड देण्याच्या उद्देशाने आला असून, नंतर युद्धकलेच्या काळात लाठीला दंड म्हटले गेले आहे. पट्टा व दांड यांचे एकत्रिकरण करून जो युद्ध प्रकार केला जातो, त्याला नंतर दांड व पट्ट्याचा खेळ म्हणून ओळख मिळाली आहे.’’ देव-देवतांच्या हाती असलेल्या लोखंडी सळीच्या अग्रणी भाल्याचे फळ, एका बाजूला परशू व दुसऱ्या बाजूला अर्धत्रिशूळ याला परशू, अंकुश असेही म्हटले आहे. तसेच काही अभ्यासकांच्या मते त्याला दांडही म्हटले जाते. शासन निर्णयामुळे मात्र शस्त्राबाबत आखाड्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.