RSS, भाजपचा पराभव करणे हीच गोविंद पानसरेंना खरी श्रद्धांजली ठरेल; 'कम्युनिस्ट'च्या सरचिटणीसांचा निशाणा
'छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर यांच्यासह आता महाराष्ट्र ही पानसरे यांची भूमी म्हणून देशभर ओळखला जाईल.’
कोल्हापूर : ‘देशातील धर्मनिरपेक्षता, समता अशी मूल्ये सत्ताधाऱ्यांकडून पायदळी तुडविली जात आहेत. संविधान, लोकशाही संपवून धर्माधिष्ठित राज्य कारभार करण्याची त्यांची तयारी सुरू आहे. त्यांचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी भाजप (BJP), आरएसएसचा (RSS) पराभव करा. हीच कॉ. गोविंद पानसरे यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे,’ असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा (D. Raja) यांनी येथे केले.
येथील ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावेळी ते बोलत होते. डी. राजा म्हणाले, ‘देश, संविधान वाचविण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह आम्ही पाऊल टाकले असून, त्याला सर्वांनी साथ द्यावी. पानसरे क्रांतिकारी, संवेदनशील नेते होते. छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर यांच्यासह आता महाराष्ट्र ही पानसरे यांची भूमी म्हणून देशभर ओळखला जाईल.’
भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले, ‘राजर्षी शाहूंचा समतेचा विचार पानसरे यांनी मांडला. सध्या देशात वर्चस्ववादी प्रवृत्तीकडून त्रास वाढत असून ही प्रवृत्ती अधिक प्रबळ होत आहे. अशा स्थितीत या प्रवृत्तीविरोधात पानसरे यांच्या विचारांनी लढा देण्याची गरज असून, त्याची सुरुवात कोल्हापुरातून निश्चितपणे होईल.’
स्मिता पानसरे म्हणाल्या, ‘बाबांच्या कर्मभूमीत त्यांच्या झालेल्या स्मारकाला विशेष महत्त्व आहे. त्यांचे परिवर्तनाचे विचार पुढे नेण्यास आमदार सतेज पाटील यांनी बळ दिले असून ते या स्मारकाचे वेगळेपण आहे. देशातील सद्याची परिस्थिती बदलण्यासाठी बाबांच्या विचारांनी कृती करण्याची वेळ आली आहे.’ शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे म्हणाले, ‘पानसरे अण्णांनी चळवळीत तरूण कार्यकर्ते घडविले. त्यांचा समतेचा विचार पुढे नेत प्रतिगामी शक्ती संपवूया.’ भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ‘आमदार सतेज पाटील आणि महानगरपालिका यांच्यामुळे स्मारकाचे काम पूर्ण झाले. सध्याचा काळ प्रतिकूल असून तो बदलण्यासाठी रेषेच्या अलीकडे असलेल्या सर्वांना एकत्रित करून त्यांचा आवाज वाढविण्याचे काम आमदार पाटील निश्चितपणे करतील.’
या कार्यक्रमात ‘कॉ. गोविंद पानसरे स्मृतिजागर’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाचे आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, शिल्पकार अशोक सुतार, ठेकेदार रविंद्र जोशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, शमशुद्दीन मुश्रीफ, राजीव आवळे, व्ही. बी. पाटील, प्रविण गायकवाड, आर. के. पोवार, उदय नारकर, श्याम काळे, सुभाष लांडे, मोहन शर्मा, रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परूळेकर, सुनिता अमृतसागर, गिरीश फोंडे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, प्रशांत देसाई, अनिल चव्हाण, बी. एल. बर्गे, सचिन चव्हाण, संदीप देसाई, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते. शाहीर सदाशिव निकम यांनी पोवाड्यातून लोकशाही, संविधान वाचविण्याची हाक दिली.
पवार यांची पानसरे यांच्या निवासस्थानी भेट
या कार्यक्रमापूर्वी खासदार शरद पवार यांनी प्रतिभानगर येथील कॉ. पानसरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पानसरे यांच्या खुनाच्या तपासाची सद्यस्थिती डॉ. मेघा पानसरे यांच्याकडून जाणून घेतली. सुमारे वीस मिनिटे त्यांनी चर्चा केली.
सत्ताधाऱ्यांना जाब विचारा
‘काळा पैसा बाहेर आला का?, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण झाले का?, दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अजून शिक्षा का झाली नाही? याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारा,’ असे आवाहन डी. राजा आणि डॉ. कांगो यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.