Election Commission : निवडणूक आयोग म्हणजे भाजपची प्रचारसंस्था; भाकप महासचिव डी. राजांचा घणाघात
पंतप्रधान मोदी यांना ‘ सबका साथ, सबका विकास’ असे म्हणण्याचा काय अधिकार आहे?
कोल्हापूर : ‘देशातील घटनाकृत विविध स्वायत्त संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत आहेत. भारत निवडणूक आयोग तर भाजपच्या (BJP) प्रचार संस्थेसारखेच काम करत आहे’, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी. राजा (D. Raja) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच भाजप व ‘आरएसएस’कडून (RSS) ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे धोरण राबविण्याचा घाट घातला जात आहे, त्याला भाकपचा विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डी. राजा म्हणाले, ‘देशातील लोकशाही, प्रजासत्ताक व राज्यघटना धोक्यात आली आहे. मोदींचा (Narendra Modi) कार्यकाळ हा विध्वंसकारी राहिला आहे. त्यामुळे भाजपला पराभूत करणे हेच आमचे सर्वप्रथम उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशातील सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी जनतेमध्ये जाऊन मोदी सरकारविरोधात लोकांना जागरूक करावे. पंतप्रधान मोदींनी वास्तवात कोणताही विकास केलेला नाही.
लोकांच्या वास्तववादी जीवन-मरणाशी निगडित मुद्द्यांवर आमच्याशी चर्चा करण्याचे त्यांना आव्हान देत आहोत. मानवी विकास निर्देशांकामध्ये देशाचा स्तर घसरला आहे. भूक निर्देशांकमध्ये देश मागे आहे. गरीबी, बेरोजगारीमध्ये जनता होरपळत आहे. पत्रकारितेचे स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये देखील देशाचा स्तर घसरला आहे. एकंदरीत कोणतेही मुलभूत काम न करता मोदी सरकार ढोंगी प्रचार करत आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘महिला, युवक, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना ‘ सबका साथ, सबका विकास’ असे म्हणण्याचा काय अधिकार आहे? नुकताच सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोरल बॉण्डबद्दल स्वागतार्ह निर्णय दिला आहे. आम्ही याला संसदेमध्ये पूर्वीच विरोध केला होता. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली हयात असताना त्यांनीच ‘मनी बिल’ च्या नावाखाली इलेक्टोरल बिल आणले होते. यामध्ये कोणतीही पारदर्शकता नव्हती. कॉर्पोरेट क्षेत्राचा ९८ टक्के पैसा केवळ भाजप या एका पक्षालाच मिळाला आहे.’
भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे म्हणाले, ‘राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण करुन राजकीय संस्कृती लयास नेली आहे. याला महाराष्ट्रातील जनता सडेतोड उत्तर देईल. भाकप हे इंडिया आघाडीसोबत असून शिर्डी व परभणी या दोन लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे.’ यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप पवार, जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, बन्सी सातपुते, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींची गॅरंटी कुठे गेली?
‘शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा संमत न केल्याने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींनी या प्रश्नावर दिलेली गॅरंटी गेली कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे’, असा टोला डी. राजा यांनी लगावला. ‘स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याचे नाटक करणारे हे सरकार त्यांनी केलेल्या एमएसपीसारख्या शिफारशींकडे कानाडोळा करत आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.