काँग्रेसची अवस्था खटारा बससारखी झालीये, त्या बसचे पार्ट पडताहेत; शिवराजसिंह चौहानांची सडकून टीका
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे. खंडित भारत हे काँग्रेसचे पाप आहे.
कोल्हापूर : ‘काँग्रेसची (Congress) अवस्था खटारा बससारखी झाली आहे. त्या बसचे पार्ट पडत आहेत. जो चालक आहे त्याला कोणत्या दिशेला जायचे आहे हेच माहिती नाही. त्यामुळे आतील प्रवासी उड्या मारून अन्य ठिकाणी पळत आहेत,’ अशी टीका मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी केली. महासैनिक दरबार हॉल येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात (Kolhapur BJP Melava) ते बोलत होते.
भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘काँग्रेसच्या खटारा बसचे राहुल गांधी नावाचे चालक आहेत. त्यांना दिशाच सापडत नाही. त्यामुळे आता आतले प्रवासी बाहेर पळत आहेत. इंडिया आघाडीची अवस्थाही अशीच आहे. शरद पवार (Sharad Pawar) मुलीसाठी, ममता भाच्यासाठी, सोनिया मुलासाठी राजकारण करत आहेत. अखिलेश, नितीशकुमार आणि केजरीवाल यांनी आघाडीपासून फरकत घेतली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची स्थिती ना नेता, ना नियत, ना नीती अशीच आहे.
भारतीय जनता पक्ष मात्र देशाच्या हितासाठी राजकारण करतो. त्यामुळेच इथे चहा विकणारा पंतप्रधान होतो, तर एका शेतकऱ्याचा मुलगा १८ वर्षे मुख्यमंत्री असतो. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी, महिला, युवा या त्रिसूत्रीवर काम केले. शेतकऱ्यांना पीक विमा, थेट खात्यात अनुदान असे लाभ मिळत आहेत. राम मंदिर आणि काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली होती. ती पूर्ण करून दाखवली. युपीएच्या काळात जगभर भारत हा घोटाळ्यांचा देश अशी प्रतिमा तयार झाली होती. मात्र आता भारत जगाचे नेतृत्व करत आहे. देशाचा अमृतकाळ सुरू आहे. देशाला विश्वगुरूपदी विराजमान करण्यासाठी, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा.’
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘काँग्रेसचा ६० वर्षे एकच नारा होता, गरिबी हटाव. मात्र गरिबी काही हटत नव्हती. आता मात्र गेल्या दहा वर्षांत देशाचा चेहरामोहरा बदलला. पायाभूत सुविधांमध्ये मोठा विकास झाला. विमानतळांची संख्या वाढली. शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात अनुदान मिळू लागले. देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या. विकासाची ही घोडदौड अशीच कायम ठेवण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठी ४०० पार हा नारा दिला आहे.’
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, भगवानराव साळुंके, समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, सत्यजित कदम, शिवाजी पाटील, हेमंत अराध्ये, डॉ. सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ममता बॅनर्जी क्रूर बनल्या
‘पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते महिलांवर अत्याचार करतात. पण ममता बॅनर्जी त्यावर काही बोलत नाहीत. त्यांच्यात आता ममता उरली नाही. त्या क्रूर झाल्या आहेत,’ अशी टीकाही चौहान यांनी केली.
भारत जोडो नव्हे, भारत तोडो यात्रा
शिरोली पुलाची : ‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे. खंडित भारत हे काँग्रेसचे पाप आहे आणि आता ते भारत जोडो यात्रा करत आहेत. परंतु ही भारत जोडो नव्हे, भारत तोडो यात्रा सुरू आहे,’ अशी घणाघाती टीका शिवराजसिंह चौहान यांनी केली. तसेच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी, त्यांना पाठबळ देणारा खासदार हातकणंगलेतून निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.येथील रुक्मिणी हॉलमध्ये आयोजित हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपच्या चिन्हावर लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे, याचा विचार व्हावा,’ अशी विनंती खासदार धनंजय महाडिक यांनी याप्रसंगी केली. यावेळी अमल महाडिक, मकरंद देशपांडे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, सुरेश हळवणकर, राजवर्धन नाईक- निंबाळकर, निशिकांत पाटील, सम्राट महाडिक, राहुल महाडिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.