Kolhapur Politics : ..तर निवडणुकीत भाजपच्या इच्छुकांनी भांडी घासायची का? ठाकरे गटाच्या नेत्याचा सणसणीत टोला
'भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. त्याचा फायदा घ्यायचा असल्यास पक्षाच्या उमेदवारीबाबत लवकर निर्णय घ्यावा.'
कोल्हापूर : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) शिंदे गट व अजित पवार गटाच्या आमदारांना ८० मतदारसंघ सोडावे लागणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या मुळच्या भाजपच्या इच्छुकांनी भांडी घासायची काय?,’ असा टोला शिवसेना (उध्दव ठाकरे गट) जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर (Arun Dudhwadkar) यांनी लगावला.
‘लोकसभेसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) जे उमेदवार देतील ते निवडून आणूया’, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित पक्षाच्या कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाप्रमुख संजय पवार, लोकसभा मतदारसंघ समन्वयक सुनील पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरुडकर, उल्हास पाटील, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, हाजी अस्लम सय्यद, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संजय चौगले, वैभव उगळे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार उपस्थित होते.
दुधवडकर म्हणाले, ‘कोल्हापूर व हातकणंगलेच्या दोन्ही जागा शिवसेनेला मिळाव्यात, यासाठी उध्दव ठाकरे यांच्याकडे आग्रही राहूया. त्यांच्याकडून जे उमेदवार दिले जातील ते निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करुया. आगामी ४० दिवस घराघरात जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवूया. याची सुरुवात पक्षाच्या ज्येष्ठ शिवसैनिकाच्या घराला भेट देऊन करा. पक्षाला सोडून गेलेले चोर, लुटारू आहेत, तर कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्षासोबत राहिलेले माजी आमदार हे प्रामाणिक आहेत.’
संजय पवार म्हणाले,‘भाजपचे १० खासदारही राज्यातून निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्यांच्याकडून पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे.’ यावेळी विजय देवणे, उल्हास पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी अवधूत साळोखे, संभाजी भोकरे, बाजीराव पाटील, शशिकांत बिडकर, दत्ताजी टिपुगडे, शशिकांत बिडकर, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते.
उमेदवारीचा निर्णय लवकर घ्यावा
‘भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. त्याचा फायदा घ्यायचा असल्यास पक्षाच्या उमेदवारीबाबत लवकर निर्णय घ्यावा. असे झाल्यास गद्दारांवर सूड उगविता येईल’, असे सांगून शाहूवाडीतून उमेदवाराला लिड देऊ, असे सत्यजीत पाटील- सरुडकर यांनी सांगितले.
‘त्यांचा’ विचार करु नका
‘इतकी वर्षे काम करूनही पक्षासाठी २५ कार्यकर्ते जे गोळा करू शकत नाहीत, ते पक्ष सोडून गेल्यामुळे काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा जास्त विचार करू नका’, असा टोला मिणचेकर यांनी मुरलीधर जाधव यांचे नाव न घेता लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.