कलिंगड, लिंबूला मागणी वाढली

कलिंगड, लिंबूला मागणी वाढली

Published on

gad33.jpg
68775
गडहिंग्लज : वाढत्या उष्म्यामुळे कलिंगडला मागणी वाढल्याने आठवडा बाजारात विक्रेत्यांनी स्टॉल उभारले होते. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------
कलिंगड, लिंबूला मागणी वाढली
कारली, गवार, प्लॉवर उतरले : आग्रा बटाट्याची आवक; जनावरांची आवक मंदावली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : वाढत्या उष्म्यामुळे कलिंगड, लिंबू, काकडीला मागणी वाढल्याने दर वधारले आहेत. भाजी मंडईत कारली, गवार, प्लॉवर यांचे दर अधिक आवकेने उतरले आहेत. आग्रा बटाट्याची नवी आवक दाखल झाली आहे. फळ बाजारात द्राक्षांची आवक वाढलेलीच आहे. जनावरांच्या बाजारात म्हैशी, गाई आणि बैलजोड्यांची आवक मंदावली आहे.
दिवसेंदिवस उष्मा वाढत चालला आहे. त्यामुळेच कलिंगड, लिंबू, काकडीला मागणी वाढली आहे. कलिंगडची लगतच्या सीमाभागासह स्थानिक आवक सुरू आहे. आकारानुसार ३० ते ७० रुपयांपर्यंत दर आहेत. लिंबूचे दर कमालीचे वाढत आहेत. विजापूर जिल्ह्यातून होणारी आवक कमी असल्याने दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शेकडा ५००-६०० रुपये असा दर आहे. किळकोळ बाजारात आकारानुसार ५ ते ८ रुपयांपर्यंत नगाचा दर आहे. काकडीलाही मागणी आहे. दहा किलोला ५०० रुपये दर असून, किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये अशी विक्री सुरू होती.
कांदे बाजारात बहिरेवाडी (ता. आजरा) येथील कांद्याला १५ ते २१ रुपये किलो असा भाव मिळाला. आग्रा बटाट्याची नवी आवक सुरू झाल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. २५ ते ३० रुपये किलो असा दर होता. इंदूर ३० रुपये, तर गुजरातचा ढिसा बटाटा २० ते २२ रुपये किलो होता. लसूण २०० ते ३०० रुपये किलो होती. मंडईत कोथिंबीर, पालेभाज्यांचे वधारलेले भाव कायम आहेत. फळ बाजारात द्राक्षे ५०, डाळिंब, चिक्कू, मोसंबी, संत्री, पेरू ८० रुपये किलो होते. जनावरांच्या बाजारात उन्हाळ्यामुळे आवक मंदावली आहे. चाऱ्याच्या कमतरतेमुळे नवी जनावरे घेणे शेतकरी टाळतात. परिणामी, उलाढालही जेमतेम आहे. सरासरी पन्नास टक्के आवक कमी असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
-----------
कोबीचा दर वाढला
गेले काही महिने मागणीपेक्षा अधिक कोबी मंडईत आल्याने दर घसरलेला होता. दोन महिन्यांपूर्वी दहा किलोचा दर १४० रुपये होता. पण, आवक कमी झाल्याने दर वाढत आहेत. सध्या २०० रुपये दहा किलो असा घाऊक बाजारात दर होता. किरकोळ बाजारात २५ रुपये किलो अशी विक्री सुरू होती.

* बाजार दृष्‍टिक्षेपात
- बहिरेवाडीच्या कांद्याला मागणी
- शेवगा तेजीत
- टोमॅटोची घसरण सुरूच
- चिंचेची आवक टिकून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.