Kolhapur Loksabha : 'कोल्हापूर'मधून मीच शिवसेनेचा उमेदवार असणार; खासदार मंडलिकांनी व्यक्त केला विश्वास
काहींनी उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवू, पुन्हा एकदा अपक्ष विजयाची पुनरावृत्ती करू, असाही निर्धार तेथे सर्वांसमोर मंडलिकांनी बोलून दाखविला.
कोल्हापूर : ‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Loksabha Constituency) मीच ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढणार आहे. काहीजणांकडून विनाकारण संभ्रम निर्माण केला जात आहे. यामागे कुजका मेंदू कोण आहे, त्याचा समाचार निवडणूक झाल्यानंतर घेणार आहे. हा कुजका मेंदू महायुतीतील नाही. कारण त्यांना त्याचा काही फायदा नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
गेली दोन दिवस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विनाकारण अन्य नावांची चर्चा होत आहे. ती घडवून आणली जात आहे. यामागे कुजका मेंदू असल्याची टीकाही खासदार मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले, ‘ज्या दिवशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले, त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य प्रमुख माझ्याकडे आले. त्यावेळी त्यांच्याकडे अकरा खासदार होते. त्यांना १२ खासदारांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे येऊन शिंदे गटात येण्याची विनंती केली होती.
तेव्हा चारशे कोटींचा निधी आवश्यक असल्याचे मी त्यांना सांगितले होते. त्यांनी हजार कोटींचा निधी देण्याचे मान्य केले. मी बारावा खासदार झाल्यानंतर कीर्तीकर हे तेरावे खासदार आमच्या गटात सहभागी झाले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. तेथे शिंदे गटातील सर्वांना खासदारकीची उमेदवारी आणि आवश्यक तो निधी देण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर आवश्यक तो हजार कोटींचा निधी दिला.
गावपातळीपर्यंत हा निधी आम्ही पोहोचविला. महायुतीत जाताना दिलेला प्रत्येक शब्द खरा केला आहे. आता कोल्हापूरसह तेरा ठिकाणचे उमेदवार हे शिंदे गटाचेच असणार आहेत. ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी तेच राहतील किंवा ते बदलण्याचा अधिकार भाजपचा असेल. मात्र, शिंदे गटातील सर्व विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार आहे.
संभ्रमावस्था दूर करण्यासाठी
‘आज तेरा मार्चला आचारसंहिता लागू होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक आयोगातील सदस्याने राजीनामा दिल्यामुळे नवीन सदस्य येईपर्यंत आचारसंहिता लागू होणे अशक्य आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून किमान पाच-सहा दिवस जाणार आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यानंतरही उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची चर्चा झाली आहे. त्यांनी तुम्ही मुंबईत थांबू नका, भागात जाऊन कामाला लागा, असे सांगितले आहे. त्यामुळे आज मी कोल्हापुरात आलो आहे. अनेक कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन येत होते. त्यामुळे ही संभ्रमावस्था आज दूर करण्यासाठी माध्यमांसमोर बोलत असल्याचेही खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केले.
संयम ठेवा, निवडणूक लढवायचीच
खासदार मंडलिक यांच्या निवासस्थानी आज तालुकापातळीवरील कार्यकर्ते थांबून होते. त्यांनी मेळावे घेण्याची तयारी केली आहे. तालुकापातळीवर त्यांचे नियोजन झाले आहे. काहींनी उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवू, पुन्हा एकदा अपक्ष विजयाची पुनरावृत्ती करू, असाही निर्धार तेथे सर्वांसमोर बोलून दाखविला. यावेळी खासदार मंडलिक यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे. त्यामुळे संयम ठेवा निवडणूक लढवायचीच आहे, असेही स्पष्ट केले.
महायुतीचे नेते करणार प्रचार
‘माझ्या प्रचारासाठी महायुतीचे नेते उपस्थित असतील. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य प्रमुखांच्या उपस्थितीत प्रचारास आरंभ होईल,’ असाही विश्वास खासदार मंडलिक यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.