Satej Patil : महायुतीचे उमेदवार ठरू देत, मग फासे कसे पडतील याची माहिती नाही; सतेज पाटलांचा नेमका कोणाला इशारा?
'आपला हार दुसऱ्याच्या गळ्यात घातला. त्यांच्यात निवडणूक लढवण्याचा दम नाही का, ही आव्हानात्मक भाषा तीन महिन्यांपूर्वी केली असती तर त्याला समर्पक उत्तर देता आले असते.'
कोल्हापूर : ‘दोन वेळा खासदारकी भूषविणाऱ्यांनी तांत्रिक माहिती घेऊन अभ्यासपूर्ण बोलावे, अशी अपेक्षा आहे. राजकीय बोलायला, माझ्यावर टीका करायला दुमत नाही; पण शहर, योजना बदनाम करणे वाईट आहे. त्यांच्या घराच्या परिसरात चार महिन्यांपासून थेट पाईपलाईनचे (Kolhapur Pipeline Plan) पाणी येत आहे. त्यांच्या अज्ञानाची कीव येते’, असा टोला आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना लगावला.
‘योजनेच्या चौकशीचे स्वागत असल्याचे सांगत पाच वर्षांच्या भाजपच्या (BJP) काळात कोणत्या परवानगी रखडल्या ते रेकॉर्डवर आणून भाजपमधीलच कुणाला अडचणीत आणायचे आहे असे दिसते, असे सूचक वक्तव्यही पाटील यांनी केले.
खासदार महाडिक यांनी केलेल्या टीकेला आमदार पाटील यांनी उत्तर दिले. आमदार पाटील म्हणाले, ‘योजनेचे पाणी जुन्या व्यवस्थेतून सी, डी वॉर्ड वगळता शहरात पोहोचले आहे. सकाळी जे, ए, बी, ई वॉर्डमधून आले होते, ते या पाण्याचीच अंघोळ करून आले असतील. खासदारांच्या रुईकर कॉलनीतील घराच्या परिसरात १० नोव्हेंबर २०२३ पासून योजनेचे पाणी आहे. तेही आंघोळीसाठी या पाण्याचा वापर करत असतील. राजकीय आरोप करण्यास हरकत नाही; पण तांत्रिक माहिती घ्यावी.
भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये योजनेचा चांगला परिणाम मतदारांमध्ये दिसत आहे. तो खोडून काढण्यासाठी माझ्या विरोधातील मुद्दा पाहिजे म्हणून हा प्रयोग केला. पण तो यशस्वी होणार नाही. योजनेतील तांत्रिक अडचणी दुरुस्तीचा प्रयत्न सुरू आहे; पण खासदारांच्या अज्ञानाची कीव येते. पुईखडीपर्यंत पाणी आणणे हेच केवळ योजनेत होते. त्यानंतर अमृत योजनेतून वितरण करायचे आहे.
अमृत योजना सध्याचे मंत्री सुरेश खाडे यांच्या बंधूकडे आठ वर्षे आहे. त्या ठेकेदाराला महापालिकेने ९ कोटींचा दंड केला आहे. जर थेट योजनेचे पाणी शहरवासीयांना लवकर पोहोचवायचे असेल, तर खासदारांनी तातडीने उद्या अमृतचा आढावा बैठक घ्यावी. काम कुणाच्या काळात मंजूर झाले, त्याचा अभ्यास करावा. भाजपशी संबंधित ठेकेदार आहे म्हणून दंड शासन माफ करणार की लावणार, हेही आता दिसेल.’
पाईप उकरून काढून तपासण्याच्या मुद्द्यावर आमदार पाटील म्हणाले, ‘दोन वेळा खासदार झालेले इतका विनोद करतात हे माहिती नव्हते. केंद्राने ६० टक्के हिस्सा दिल्याचे त्यांचे मत आहे, तर चुकीच्या पाईपला दिलेले पैसे केंद्राने पाहिले नाही असे त्यांना म्हणायचे आहे का? योजनेबाबत व्हाईट आणा, ब्लॅक आणा, यलो येऊ दे; पण माझे श्रेय असलेला थेट पाईपचा मुद्दा त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी तो बाजूला काढता येणार नाही. राजाराम कारखान्यात मी लढू नये, ही त्यांची इच्छा होती; पण त्याला मी मान्यता दिली नव्हती. तो विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे.’
तीन महिन्यांपूर्वी असते तर ...
‘आपला हार दुसऱ्याच्या गळ्यात घातला. त्यांच्यात निवडणूक लढवण्याचा दम नाही का, ही आव्हानात्मक भाषा तीन महिन्यांपूर्वी केली असती तर त्याला समर्पक उत्तर देता आले असते, असे सांगत आमदार पाटील म्हणाले, ‘आव्हानाला मी घाबरत नाही व आव्हान दिल्यानंतर मैदान सोडणाराही मी नाही. ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती अशी आहे. जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. देशात वेगळे वातावरण आहे. इंडिया आघाडीची सत्ता येणार यात शंका नाही.’
कोण उद्या माझ्या स्टेजवर...
आमदार पाटील म्हणाले, ‘मंडलिकांबाबत आज बोलणे सयुक्तिक ठरणार नाही. महायुतीचे उमेदवार ठरू देत. फासे कसे पडतील याची माहिती नाही. उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे कुणावर टीका करायची नाही. ही जागा काँग्रेसला मिळावी, शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी ही भूमिका आहे. त्यात बदल नाही. महायुतीतच विळा- भोपळ्याचे नाते आहे.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.