भारीच! शेतीकाम करणारा रोबोट अन् दिव्यांगांची स्मार्ट व्हीलचेअर; न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून महत्त्वपूर्ण संशोधन
बिया पेरणी, खुरपणी आणि कीटकनाशकाची फवारणी अशी कामे करण्यासाठी हा रोबोट उपयुक्त ठरणारा आहे.
कोल्हापूर : शेतीतील कामाला मदत करणारा व्हाइस कंट्रोल ॲग्रिकल्चर रोबोट (Vice Control Agricultural Robot) आणि दिव्यांग (फिजिकली हॅन्डिकॅप्ड पर्सन्स) व्यक्तींना उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट व्हीलचेअरचे संशोधन न्यू कॉलेजमधील (New College) इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यांच्या समाजपयोगी संशोधनाची दखल घेऊन राज्य शासन त्यांना स्टार्टअपसाठी बळ देणार आहे.
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज (Maharashtra Student Innovation Challenge) उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी दिला आहे. व्हाइस कंट्रोल ॲग्रिकल्चर रोबोटचे सादरीकरण मैत्रिय नाईक, हेमंत पाटील, विघ्नेश पाटील यांनी केले. सध्या शेतीकामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यावर तंत्रज्ञानाचा वापर करून मदतीचा हात देण्यासाठी या रोबोटची नवसंकल्पना या विद्यार्थ्यांनी संशोधनातून मांडली.
बिया पेरणी, खुरपणी आणि कीटकनाशकाची फवारणी अशी कामे करण्यासाठी हा रोबोट उपयुक्त ठरणारा आहे. दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट व्हीलचेअरची कल्पना महंमदमुनीफ अन्सारी, अमोलिका सुतार आणि उर्वी उपळेकर यांनी मांडली. या व्हीलचेअरमध्ये दिव्यांग व्यक्ती बसल्यानंतर त्याने डोके पुढे वाकवल्यानंतर ती व्हीलचेअर पुढे, तर डोके मागे वाकवल्यानंतर मागे जाते. डाव्या बाजूला मान वाकवल्यानंतर त्या दिशेने आणि उजव्या बाजूला केल्या त्या बाजूला व्हीलचेअर जाते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीला स्वतः एका ठिकाणाहून दुसरीकडे ये-जा करणे सोयीस्कर ठरणार आहे.
या दोन्ही संशोधनाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात केले. त्यातून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेतील सहभागासाठी या संशोधनाचे प्रोटोटाईप मॉडेल बनविण्यासाठी त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी शासनाने दिला आहे.
या विद्यार्थ्यांना श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. आर. डी. ढमकले, प्रबंधक एम. वाय. कांबळे, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे डॉ. के. डी. अत्तार यांचे मार्गदर्शन लाभले.
संशोधनाचा टक्का वाढला
महाविद्यालयाने शिक्षक, विद्यार्थ्यांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी स्वतंत्र निधी, उपक्रम राबविल्याचा चांगला परिणाम झाला आहे. संशोधनाचा टक्का वाढला आहे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमातील यशातून महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीची पोचपावती मिळाली असल्याचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी सांगितले. राज्यस्तरीय स्पर्धेत या विद्यार्थ्यांना निश्चितपणे यश मिळणार आहे. त्यांनी मांडलेले नवसंशोधन प्रत्यक्षात स्टार्टअपमध्ये रुपांतरीत करण्यासाठी शासनाचे बळ मिळाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.