शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
92736
शाहू विचारांचा आज जागर
राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त उद्या (बुधवारी) शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानिमित्त शहरासह जिल्हा शाहूमय झाला असून, सर्वत्र शाहूंच्या विचारांचा जागर घातला जाईल.
उद्या सकाळी आठच्या सुमारास लक्ष्मीविलास पॅलेस येथे अभिवादन आणि त्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. शाहू महाराज पुतळा, समाधीस्थळ परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. शाहू समाधीस्थळावरही अभिवादनासाठी गर्दी होणार आहे. शाळा व महाविद्यालयातही विविध कार्यक्रम, स्पर्धा होणार आहेत.
भव्य शोभायात्रा, शाहू पुरस्काराचे वितरण
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता शोभायात्रेचे दसरा चौकात उद्घाटन होईल. त्यानंतर शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गावरून जाईल. शोभायात्रेमध्ये शाहू कार्यावर आधारित चित्ररथ, पारंपरिक वाद्य पथकांचा सहभाग असेल. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांना प्रदान करण्यात येईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. हा सोहळा दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी सहाला होईल.
जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना प्रारंभ
जिल्हा प्रशासनातर्फे विविध ठिकाणी सलग सहा दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. आज तालुक्याच्या ठिकाणी ‘शाहू विचार जागर’ हा कार्यक्रम झाला. उद्या (बुधवारी) सकाळी आठ वाजता राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन, त्यानंतर साडेनऊ वाजता सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा आदी ठिकाणी वृक्षारोपण होईल. शिवाजी विद्यापीठांतर्गत दीडशे महाविद्यालयात शाहू विचारांवर व्याख्याने होतील.
लोकराजा चित्र-शिल्प प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ
जिल्हा प्रशासन आणि चित्रकार-शिल्पकारांतर्फे उद्या (बुधवार) पासून लोकराजा चित्र-शिल्प प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. शहर आणि जिल्ह्यातील २६ कलाकारांच्या कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश असेल. प्रदर्शन शुक्रवार (ता. २८) अखेर सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.
ऐतिहासिक दुर्मीळ कागदपत्रे, छायाचित्रांचे प्रदर्शन
शासनाच्या पुराभिलेख संचालनालयातर्फे उद्या (बुधवारी) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट व त्यांचे कार्य उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मीळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सलग पाच दिवस प्रदर्शन होणार आहे. ‘राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग-२’ या खंडाच्या सुधारित आवृतीचे यावेळी प्रकाशन होईल. प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुरालेखागार विभागाच्या सहायक संचालक दीपाली पाटील यांनी केले आहे.
बिंदू चौकातही विविध कार्यक्रम
हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था, शरद पवार विचार मंच ट्रस्टतर्फे बिंदू चौकात सकाळी साडेअकरा वाजता अभिवादन कार्यक्रम होणार आहे. आमदार जयश्री जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर, व्ही. बी. पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.