Kolhapur: आई अन् मुलांची ताटातूट झाली पण...घरट्यांतील पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न, कोल्हापूरकरांच्या जिद्दीला सलाम
कोल्हापूर, ता. २३ : गेले काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, त्यातही झाडांवरील आपल्या घरट्यात ही पिल्ले आणि अंडी सुरक्षित होती. मात्र, आज दुपारी विपरित घडलं आणि वीस ते बावीस घरट्यांची वसाहतच असणारी झाडाची एक मोठी फांदी शेजारील इमारतीवर तुटून पडली. सुमारे तासाभराहून अधिक काळानंतर महापालिकेच्या यंत्रणेने छोट्या फांद्यासह घरटी सुरक्षितपणे बाजूला करून त्या इमारतीवरच ठेवली. या आई-बाप आणि मुलांचा संसार पुन्हा नव्याने फुलणार का, याची उत्सुकता आता साऱ्यांना लागून राहिली आहे.
निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक या मार्गावरील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळच्या झाडाची ही मोठी फांदी आज दुपारी एकच्या सुमारास तुटून पडली. अगदी अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे या पिलांचे आई-बाप परिसरातूनच घिरट्या घालत होते. पण, आता ते स्वतः काही करू शकतील, अशी परिस्थितीच नव्हती. महापालिकेची यंत्रणा तत्काळ येथे दाखल झाली. पण, या फांदीवर पक्षांची घरटी मोठ्या संख्यने असून त्यात पिल्ले आणि अंडी असल्याचे या यंत्रणेच्या लक्षात आले. अखेर त्यांनी पर्यावरण, पक्षीप्रेमींशी संपर्क साधला.
विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड येथे आले. त्यानंतर ही घरटी दुसरीकडे शिफ्ट करणे, अशक्य आहे. त्यामुळे किमान आहे त्या स्थितीत ती सुरक्षित कशी राहतील, याची खबरदारी घेण्याचे ठरले. महापालिकेच्या यंत्रणेने बूमच्या सहाय्याने घरट्यांना कुठलीही बाधा येणार नाही, याची खबरदारी घेत ती मोठ्या फांदीपासून बाजूला केली आणि त्या इमारतीवरच ती सुरक्षित ठेवली गेली. सायंकाळी सातपर्यंत हा सारा खटाटोप सुरू होता.
सलग सहा तास प्रयत्न...
उदय गायकवाड सांगतात, ‘सलग सहा तासांच्या महापालिका यंत्रणेच्या परिश्रमानंतर सर्व घरटी सुरक्षितपणे बाजूला करणे शक्य झाले. प्रत्येक घरट्याला स्वतंत्र आळी करून ती त्या इमारतीवरच ठेवली आहेत. प्रत्येक घरट्यात चार ते पाच पिल्ले आणि अंडी आहेत. ही परिसरातीलच इतर झाडांवरून विस्थापित झालेली बगळ्यांची वसाहत असावी. पण, या पिलांचे आई-वडील जवळच्याच इतर झाडांवरून घिरट्या घालत आहेत. पिल्लांच्या आवाजाने ही मंडळी घरट्याजवळ येऊन आपल्या पिल्लांना कशी स्वीकारतात, अंड्यातून नवी पिल्ले जन्माला येतील का आणि पुन्हा पुढे काही सकारात्मक गोष्टी घडतात का, हे आता पाहावे लागेल.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.