girl child crime
girl child crime

Kolhapur: चिमुकली बेपत्ता झाल्याचा बनाव अन्... शियेमध्ये नेमकं काय घडलं? श्वानपथकामुळे समोर आलं जवळच्या नात्यातील नराधमाचे कृत्य..

कोल्हापूरजवळील शिये येथील घटनेने संताप; जवळच्या नात्यातील नराधमाचे कृत्य आठ तासांत संशयिताला बेड्या, पुढील तपासासाठी ''विशेष पथक'' स्थापन
Published on

नागाव, ता. २२ : जवळच्या नातेवाईकाने १० वर्षीय परप्रांतीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. संशयित व चिमुकलीचे कुटुंबीय मूळचे बिहारचे असून, कामाच्या निमित्ताने कोल्हापुरात राहण्यास आहेत. बुधवारी दुपारपासून ती बेपत्ता झाल्याने शोध सुरू होता.

शिये-कसबा बावडा (ता. करवीर) राज्य मार्गावरील श्रीरामनगर मुलीच्या राहत्या घरापासून ८०० मीटर अंतरावर पडलेला तिचा मृतदेह पोलिसांच्या श्वानाने शोधून काढला. या कुटुंबासोबत राहणाऱ्या नात्यातील २५ वर्षीय संशयितानेच हे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, सखोल तपास होण्यासाठी एका विशेष पथकाचीही स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोलकता, बदलापूरपाठोपाठ कोल्हापूरमध्ये घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्यात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका परप्रांतीय दांपत्याला तीन मुली व दोन मुले अशी पाच अपत्ये आहेत. तीन वर्षांपासून कोल्हापुरात आलेल्या आई-वडिलांच्या अनुपस्थितीत संशयित आरोपीच या मुलांचा घरी सांभाळ करत होता. दहा वर्षांची पीडित मुलगी ही भावडांत सर्वात मोठी आहे. बुधवारी (ता. २१) सकाळी आई-वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले. दुपारी एकच्या सुमारास घरात त्यांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाने पीडित मुलीला मोबाईल दिला आणि स्वतः खोलीत जाऊन झोपला.

चिमुकली मुलगी बेपत्ता झाल्याचा बनाव...

बुधवारी सायंकाळी मुलीची आई कामावरून परतली. तिने मुलीबाबत परिसरात चौकशी सुरू केली. शेजारी राहणाऱ्या महिलांनी याची माहिती शिरोली एमआयडीसीचे सहायक निरीक्षक पंकज गिरी यांना दिल्यानंतर ते मुलीच्या घरी दाखल झाले. त्यांनीही भागात चौकशी केल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास चिमुकली बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात केली. शिये गावात याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थही पहाटेपर्यंत शोध घेत होते.

श्वानपथकाला पाचारण....

मुलीच्या घरापासून दीड ते दोन किलोमीटर परीघामधील सीसीटीव्ही तपासणीचे काम पोलिसांकडून सुरू केले होते. तसेच श्वानपथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आज सकाळी पोलिसांकडून श्वानाला पीडित मुलीच्या वापरातील कपडे हुंगविण्यात आले. यानंतर या श्वानाने मुलीच्या घरापासून आठशे मीटर अंतरापर्यंत शेतवडीपर्यंत माग काढला असता, येथील ओढ्याच्या काठाला चिमुकलीचा मृतदेह मिळून आला. मुलीच्या पाठीवर मारहाणीचे व्रण असून, बलात्कार केल्यानंतर जोरदार झापड लगावल्याने हे व्रण उठल्याचे वैद्यकीय अहवालात पुढे आले.

सीसीटीव्हीत संशयिताच्या हालचाली....

घटनास्थळाकडे येणाऱ्या मार्गावरील एका सीसीटीव्हीमध्ये बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एक संशयित व्यक्ती मुलीला शेताकडे घेऊन जाताना दिसून आला; परंतु या कॅमेऱ्याची दिशा कारखान्याच्या शटरकडे वळविण्यात आल्याने संशयित व मुलीच्या कमरेपर्यंतचा भाग दिसत होता. संशयिताचा चेहरा यामध्ये दिसून न आल्याने काही काळ संभ्रम होता.

सहा संशयित ताब्यात...
मुलीच्या कुटुंबियांशी संबंधित, परिसरात संशयास्पद वावर, भागातील ९ सीसीटीव्हींच्या आधारे मिळालेल्या रेकॉर्डिंगवरून ६ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यांच्याकडे गुरुवारी दुपारनंतर कसून चौकशी सुरू करण्यात आली. यातील तिच्या नात्यातील एका संशयास्पद व्यक्तीकडे पाच तासांहून अधिकवेळ सखोल केलेल्या चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले.

मुलीला रागावल्याचा बनाव व शोधमोहिमेत पुढाकार...
पाच मुलांची देखभाल करणारा संशयित हा चिमुकलीच्या आईकडील नातेवाईक आहे. तो बुधवारी दिवसभर घरात होता. मुलीच्या आईने त्याला बुधवारी मुलीबाबत विचारणा केली असता, त्याने मुलगी दंगा करत असल्याने आपण तिला रागावलो. दोन कानशिलात लगावल्याने ती चिडून निघून गेली, असे सांगितले. यानंतर बुधवारी सायंकाळी ७ वाजता तो स्वतःच्या कामावर निघून गेला. गुरुवारी सकाळी ८.३० ला परतल्यानंतर पोलिसांसोबत मुलीचा शोध घेण्यासाठीही तो पुढे होता. मुलगी कोठे, कोठे जाऊ शकते, याची माहितीही तो पोलिसांना देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता.

विशेष पथक करणार सखोल तपास...
मारहाणीत मुलीच्या डोळ्याला मोठी दुखापत झाल्याचे प्राथामिक तपासात समोर आले. तिच्या डोळ्याला झालेली इजा मारहाणीत झाली की येथे श्वापदांनी केली, याची माहिती पोलिस घेणार आहेत. तसेच संशयित आरोपी तीन महिन्यांपूर्वीच कोल्हापुरात आल्याने त्याची यापूर्वी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?, मुलीवर अत्याचार व खून यामध्ये किती वेळेचे अंतर होते?, संशयित आरोपीने विकृतीतून हे कृत्य केले असावे का? याचा तपास होण्यासाठी करवीर उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जणांचे विशेष पथक नेमण्यात आले. या पथकामध्ये उपनिरीक्षक दर्जाचे २ अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दोन पोलिस, अवैध मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाचे २ कर्मचारी असणार आहेत.

बुधवारी बिहारला जाण्याचा होता विचार....
मुलीच्या वडिलांचा बुधवारी पगार होणार होता. पगार झाल्यानंतर कुटुंबियांची बिहारला जाण्याची तयारी सुरू होती. दरम्यान, बुधवारी दुपारीच चिमुकली बेपत्ता झाली. बुधवारी सकाळीच हे कुटुंब बिहारला गेले असते तर, कदाचित हा प्रकार टळला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. गुरुवारी रात्री चिमुकलीच्या मृतदेहावर शिये येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
-------
आज शिये बंद...

परप्रांतीय चिमुरडीवर नराधमाने अमानुषपणे अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. २३) शिये गाव बंद ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच शीतल कदम यांनी सांगितले. बदलापूर, पुणे आणि त्यानंतर कोल्हापुरात शिये येथे एका निरपराध चिमुरडीचा नराधमाने अमानुषपणे अत्याचार करून खून केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तात्काळ तपास करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...