Kolhapur
Kolhapur sakal

Kolhapur : शिंगणापूर मार्ग १५ दिवसांपासून अंधारात,वाहनधारकांसह पादचाऱ्यांचीही कसरत

Kolhapur : शिंगणापूर मार्गावर गेल्या १५ दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्ग रुंदीकरण कामातील विलंबामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
Published on

शिंगणापूर : शिंगणापूर मार्ग गेल्‍या १५ दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करून पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

कोल्हापूर-गगनबावडा १६६ जी राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम गेले अनेक महिने सुरू आहे. रुंदीकरणातील झाडांची तोडणी सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याचे वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. गगनबावडा महामार्गाला शिंगणापूर मार्ग येऊन मिळत असल्याने त्याचा परिणाम आता शिंगणापूर मार्गावरील पथदिव्यांवर होत असून हा रस्‍ता अंधारात आहे.

कोल्हापूर-गगनबावडा १६६ जी हा राष्ट्रीय महामार्ग सिंधुदुर्ग, रत्नागिरीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. सध्या या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या वृक्ष तोडीचे काम खांडसरी नाक्याजवळ सुरू आहे.झाडे तोडताना झाडांवरील विद्युत वाहिन्यांचा विजेचा धक्का बसू नये, यासाठी शिंगणापूर मार्गावरील विद्युत पथदिव्यांचा विद्युतपुरवठा गेल्‍या १५ दिवसांहून अधिक काळ खंडित केला आहे.

सध्या वृक्षतोडीचे काम संथ गतीने सुरू असल्याने नाराजी आहे. खांडसरी नाक्यावर खड्डे पडले असल्याने अंधार पडल्यावर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात भर म्हणून खांडसरीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही कुत्री दुचाकीस्वारांचा व पादचाऱ्यांचा पाठलाग करून चावा घेत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरील व दत्तनगर परिसरातील पथदिव्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी होत आहे.

कोल्हापूर विभागातून पुरवठा व्हावा

शिंगणापूर मार्गावरील उजवीकडील कॉलन्या या म्हसोबा मंदिरपर्यंत महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५१ च्या हद्दीत येतात. तरीदेखील या कॉलन्यांतील वस्त्यांना महावितरणच्या ग्रामीण उपविभागाकडून विद्युतपुरवठा केला जातो व कॉलन्यांतील पथ दिव्यांना कोल्हापूर महानगर विभागाकडून पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात शहराच्या तुलनेने वारंवार विद्युतपुरवठा खंडित होतो. त्यामुळे आमच्या कॉलन्यांना कोल्हापूर महानगर विभागाकडून विद्युतपुरवठा व्हावा, अशी प्रभाग क्रमांक ५१, लक्षतीर्थ वसाहत परिसरातील नागरिक करत आहेत.

गगनबावडा महामार्गाचे काम सुरू असल्याने सर्व्हिस वायर कोठे तुटली असेल तर झाडे तोडताना विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते. म्हणून महावितरणने विद्युतपुरवठा खंडित केला आहे. परिसरातील नागरिकांनी महावितरणकडे तक्रार दिली असेल, तर विद्युतपुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.

- नारायण पुजारी, विद्युत अभियंता, महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.