समरजीतसिंह घाटगे मुलाखत

समरजीतसिंह घाटगे मुलाखत

Published on

सात हजार कोटी निधी आणला; पण
खर्च कुठे केला? ः समरजितसिंह घाटगे

माझी लढाई केवळ राजकारण करण्याची नाही. कागलमध्ये परिवर्तन घडवून लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मी संघर्ष करत आहे. त्यासाठी राजकारण हे माध्यम आहे. विद्यमान आमदार २५ वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या काळात त्यांनी सात हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा केला; पण हा खर्च कुठे केला, त्याचाही खुलासा त्यांनी करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी दिले.
- ओंकार धर्माधिकारी

प्रश्न ः भाजपने तुम्हाला म्हाडाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्षपद दिले. तरीही तुम्ही पक्ष का बदलला?
उत्तर- माझी लढाई केवळ राजकारण करण्याची नाही. कागलमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी मी संघर्ष करत आहे. राजकारण हे त्याचे माध्यम आहे. राज्याच्या राजकारणात अशी परिस्थिती निर्माण झाली की भाजपला कागलची जागा मिळणार नव्हती. गेल्यावेळी मी अपक्ष निवडणूक लढवली आणि चांगली मते घेतली; पण विजयासाठी पक्षाचे व्यासपीठ आवश्यक असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षात प्रवेश केला. एकदा मी अपक्ष निवडणूक लढवली. आता विजयाची संधी असूनही जर मी अपक्ष निवडणूक लढवली असती तर मला कागलच्या जनतेने माफ केले नसते. शरद पवार यांना मानणारा वर्ग माझ्यासोबत आहे.

प्रश्न ः कागलचा विकास, सात हजार कोटी निधीच्या मुश्रीफांच्या दाव्याविषयी काय सांगाल?
उत्तर- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विकासकामांची पुस्तिका प्रसिद्ध केली. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कारण या पुस्तिकेतील काही विकासकामे पहावीत आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहावे म्हणजे तुम्हाला त्यांनी केलेल्या विकासातील विसंगती दिसून येईल. पुस्तिकेत वंदूर गावात ४० लाख रुपये खर्च करून मैदान उभारले असे म्हटले आहे. पण, प्रत्यक्षात ते मैदान शोधून दाखवावे. पिंपळगाव येथे मंदिराच्या नूतनीकरणासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च केले, असे त्यांनी पुस्तिकेत नोंदवले आहे; पण प्रत्यक्षात हे काम लोकवर्गणीतून केल्याचे गावकरी सांगतात. अशा प्रकारची अनेक कामे मतदारसंघात दाखवता येतील. सात हजार कोटी रुपयांचा निधी नेमका गेला कुठे? निधीचे आकडे सांगून ते मतदारांना फसवत आहेत.

प्रश्न ः मुश्रीफांनी आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली, असे त्यांचे समर्थक म्हणतात. त्याबद्दल का सांगाल?
उत्तर- कागलमध्ये कार्डियोलॉजिस्ट नाही. हृदय शस्त्रक्रियेसाठी कोल्हापूर किंवा मुंबईला जावे लागते. इतकी वर्षे आमदार, मंत्री असून मुश्रीफांना कागलमध्ये शासकीय रुग्णालय सुरू करता आले नाही. छोट्या छोट्या उपचारांसाठी लोकांनी आपल्या दारात यावे, हीच त्यांची मानसिकता आहे. केवळ शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हे काही लोकप्रतिनिधीचे काम नाही.

प्रश्न ः शाहू दूध संघ तुम्ही विकला, असा आरोप विरोधक करत आहेत?
उत्तर- मी भाजपमध्ये असताना महाविकास आघाडी सरकारने शाहू दूध संघाला अनुदान दिले. मी संघ विकला असता तर अनुदान मिळाले असते का? संघ विकला तर तो कोणाला विकला? कोणी खरेदी केला? सध्या हा दूध संघ कोण चालवतो? या प्रश्नाचे उत्तर विरोधकांनी द्यावे. त्यांच्याकडे मी दूध संघ विकल्याचा एक तरी कागद आहे का? त्यांनी ते सिद्ध करावे. खोटे बोलून जनतेची दिशाभूल करू नये. विरोधकांच्या तथ्यहीन आरोपाला जनताही सरावली आहे.

प्रश्न ः दलित समाजाच्या जमिनी आपण बळकावल्या, असा आरोपही होत आहे?
उत्तर- मी जमीन बळकावली असा आरोप ते करत असतील, तर हे हास्यास्पद आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडेच आहे. मग माझ्यावर गुन्हा का नाही दाखल केला? केवळ हवेत आरोप करून काय उपयोग? मी कोणाचीही जमीन बळकावली नाही. मला त्याची गरज नाही. उलट हसन मुश्रीफांवर शरद गृहनिर्माण संस्थेची जमीन बळकावल्याचे आरोप होत आहेत. जमिनीची किंमत पाचशे कोटी रुपये असल्याचे आरोप करणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचे उत्तर मुश्रीफांनी द्यावे.

प्रश्न ः कागलच्या विकासाबाबत आपला दृष्टिकोन काय आहे?
उत्तर- कागलमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी हाच मुख्य व्यवसाय आहे. प्रगतशील शेतीसाठी काही मूलभूत गोष्टी येथे उपलब्ध केल्या पाहिजेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सबलीकरण या गोष्टींवर काम करणार आहे. औद्योगिक गरज ओळखून तरुण, तरुणींसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. कागलमध्ये शासकीय रुग्णालय होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.