बजरंग पुनिया गंगावेश भेट
KPC24B15842
कोल्हापूर : ऑलिंपिकवीर बजरंग पुनिया याने रविवारी राजर्षी छत्रपती शाहू विजयी गंगावेस तालमीला भेट दिली. त्यावेळी विश्वास हारुगले, माऊली जमदाडे, सिकंदर शेख, उत्तम पाटील, तौफिक मुल्लाणी, ऋषिकेश पाटील, आदी.
मॅट कुस्तीवर लक्ष केंद्रित करा
बजरंग पुनिया याचा कोल्हापुरातील मल्लांना सल्ला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : मॅटच्या कुस्तीकडे लक्ष केंद्रित करत ऑलिंपिक पदक मिळविण्याचा ध्यास ठेवा, असे आवाहन ऑलिंपिकवीर बजरंग पुनिया याने आज येथे केले.
राजर्षी शाहू गंगावेस तालमीस त्याने भेट देत, तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पैलवानांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत, भारतीय कुस्ती महासंघातील वाद मनात आणले तर केंद्र सरकार चुटकीसरशी मिटवू शकते, असेही स्पष्ट केले.
बजरंग म्हणाला, ‘‘पैलवानांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकायचे असेल तर त्यांनी मॅटवरील कुस्तीकडे वळले पाहिजे. मॅटवरील सहा मिनिटांची कुस्ती मातीतील अर्धा तासाइतकी आहे. देशात आजपर्यंत ऑलिंपिकची आजवर सात पदके आली आहेत. एक पदक आता महाराष्ट्रातून येणे आवश्यक आहे. हरियाणात मॅटवरील कुस्तीवर भर दिला जात आहे. माझ्या गावात तीन मॅट आहेत. राहुल आवारे, नरसिंग यादव यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मॅटमुळे झाली आहे.’’
भारतीय कुस्ती महासंघातील वादासंदर्भात तो म्हणाला, ‘‘भाजप सरकारमधील माणसं पैलवानांशी कशी वागतात, हे देशाने पाहिले आहे. महिला पैलवानांना दांडक्याचा मार सहन करावा लागला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पैलवानांना हव्यात त्या सुविधा नक्की दिल्या जातील.’’ वस्ताद विश्वास हारुगले व सुभेदार उत्तम पाटील यांनी तालमीतील पैलवान कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत सराव करतात, याची माहिती दिली. यावेळी महान भारत केसरी माऊली जमदाडे, सिकंदर शेख, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, उमेश पोवार, ऋषिकेश पाटील, नागेश साळोखे, अरुण सावंत, संताजी भोसले, गिरीश फोंडे, सुनील खिरुगडे, उदय देसाई उपस्थित होते.
बजरंगने तालमीतील आयुष भास्कर हिलार या छोट्या पैलवानाचे कौतुक केले. त्याला ‘मिट्टी की या मॅट की कुश्ती खेलोगे?,’ ‘कौनसा मेडल जितोगे?’ असे हलक-फुलके प्रश्न करत संवाद साधला. वस्ताद विश्वास हारुगले यांनी त्याचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला. त्यानंतर त्याला थंडाई प्यायला दिली. कोल्हापूर पानपट्टी असोसिएशनचे अरुण सावंत यांनी सायकलसमवेत छायाचित्र घेतले.
कोट
ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ने सन्मानित करा, अशी मागणी करावी लागते, हेच दुर्दैव आहे. त्यांना सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करायला हवे होते; मात्र, जे भाजपसमोर लोटांगण घालतात, भाजपसोबत असतात त्या खेळाडूंना पुरस्कार दिले जातात.
- बजरंग पुनिया, कुस्तीपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.