प्रचार सांगता
प्रचाराच्या धडाडणाऱ्या
तोफा आज थंडावणार
पडद्यामागील घडामोडींना येणार वेग
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. १७ : विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धडाडणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा आज थंडावणार आहेत. या निमित्ताने उठलेला प्रचाराचा धुरळाही खाली बसणार आहे. या निवडणुकीतील जाहीर प्रचाराची सांगता उद्या (ता. १८) सायंकाळी सहाला होणार असून, मतदान २० नोव्हेंबरला आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतरचे दोन दिवस पडद्यामागील हालचाली वेग घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरला घोषित झाली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. उमेदवारीसाठी इच्छुकांनी मुंबईच्या वाऱ्या केल्या. उमेदवारांची घोषणा होऊन प्रचाराला सुरुवात झाली. पक्षाची ध्येयधोरणे, विकासकामे याभोवती प्रचार सुरू होता; मात्र उमेदवारी अर्ज भरल्यावर व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सतेज पाटील यांनी खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्त्यांबाबत उच्चारलेल्या शब्दांमुळे त्यांचा विरोधकांनी समाचार घेतला. फुलेवाडी येथील सभेमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या विधानांचा राज्यभर निषेध करण्यात आला. या दोन्ही विधानांमुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली. कोपरा सभा, पदयात्रा, मिसळ पे चर्चा, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून उमेदवारांनी जनतेशी संवाद साधला. काही उमेदवारांनी सकाळी फिरायला येणाऱ्या नारिकांशी रंकाळा, शिवाजी विद्यापीठ येथे जाऊन संवाद साधला. तर विविध जाती, पंथ, धर्म यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपली भूमिका मांडली.
अखेरच्या टप्प्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील नेत्यांनी येऊन सभा, पत्रकार परिषदा घेतल्या. महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीच्या टप्प्यात सभा घेतल्या. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची मोठी सभा गांधी मैदान येथे झाली. राजस्थानचे माजी मंत्री सचिन पायलट यांनी कसबा बावडा येथे जाहीर सभा घेतली. मल्लिकार्जुन खर्गे यांनीही येथे प्रचारात सहभाग घेतला. याशिवाय आमदार सतेज पाटील, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी प्रचारात सहभाग घेऊन जाहीर सभा घेतल्या. महायुतीच्या राज्याच्या प्रचाराचा प्रारंभ मेरी वेदर मैदानावरील सभेने झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे आमदार, खासदार उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी शहरातील डॉक्टर, वकील, उद्योजक यांच्याशी संवाद साधून त्यांना पक्षाची भूमिका सांगितली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील येऊन विविध घटकांशी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सभा आणि बैठका घेतल्या. तर देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी येथे सभा घेतली.
जाहीर प्रचारानंतर व्यक्तिगत गाठीभेटींना सुरुवात होईल. शहरात जागोजागी जेवणावळींचे कार्यक्रम राजरोसपणे सुरू आहेत. आता प्रत्येक भागातील मते मिळविण्यासाठी जोडण्या लावण्याचे काम सुरू आहे. यासाठी नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही मैदानात उतरले आहेत.
गठ्ठा मतदानावर नजर
गठ्ठा मतदान आहे तेथील प्रमुखांना उमेदवारांच्या कार्यालयात बोलावून घेतले जात आहे. त्यांना काय हवे नको ते पाहून मते आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
----------------
गावागावांत आज शक्ती प्रदर्शन
सर्वच पक्षांनी मतदारसंघातील विविध गावांसह शहरातील विविध भागांत पदयात्रेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून शक्ती प्रदर्शन होणार आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.