कोल्हापूर विमानतळाचं नामांतरण केव्हा होणार? छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याचा निर्णय होऊन लोटली सहा वर्षे
‘कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यात यावे, यासाठी आमचे सातत्याने आंदोलन सुरू आहे.'
शिरोली पुलाची : कोल्हापूर विमानतळास (Kolhapur Airport) छत्रपती राजाराम महाराज (Chhatrapati Rajaram Maharaj) यांचे नाव देण्याचा निर्णय होऊन तब्बल सहा वर्षे झाली, तरी नामांतरणाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या विमानतळाची कोल्हापूर विमानतळ म्हणूनच ओळख कायम असून, विमानतळाच्या नामांतरणाची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल राजाराम महाराजप्रेमी जनतेतून होत आहे.
कोल्हापूर संस्थानात (Kolhapur Institute) दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने व्यापारवाढीसाठी विमानतळ असावे, या हेतूने छत्रपती राजाराम महाराजांनी प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराजांनी (Rajarshi Shahu Maharaj) रेल्वे सुरू करून दळणवळण सेवा वाढविली. तोच वारसा घेऊन छत्रपती राजाराम महाराजांनी विमानसेवेचा पाया रचला. १९३०-३५ ला विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७० एकर जमीन संपादित केली. विमानतळाचे उद्घाटन ४ मे १९४० ला छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले. १९७८-७९ ला विमानतळाचे विस्तारीकरण झाले.
उद्योगनगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरला खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावर नेण्याचे काम त्यांनी केले. जिल्ह्यातील उद्योग, शेती क्षेत्राचा विकास साधता आला. राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. ज्या पद्धतीने रेल्वे सेवा सुरू करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे नाव रेल्वेस्थानकाला दिले, त्याच पद्धतीने विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव मिळावे म्हणून विविध संघटनांनी आंदोलन करून ही मागणी लावून धरली होती. अनेक वर्षे त्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा सुरू होता.
त्यामुळे छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूर विमानतळास देण्याची घोषणा १७ डिसेंबर २०१७ रोजी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. १७ जानेवारी २०१८ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा ठराव झाला. यास तब्बल सहा वर्षांचा कालावधी लोटला, तरी नामांतरणाबाबत कार्यवाही झालेली नाही.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील विमानतळांच्या विस्तारीकरणासाठी आणि विकासासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कोल्हापूरच्या विमानतळावर विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. विमानतळाच्या विस्तारीकरणासह सुसज्ज देखणी टर्मिनल इमारत साकारली आहे. या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करतानाही विमानतळाची ओळख ‘कोल्हापूर विमानतळ’ अशीच राहिली आहे.
‘कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यात यावे, यासाठी आमचे सातत्याने आंदोलन सुरू आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर’ अशा नामकरणासह झाली असती तर ही गोष्ट कोल्हापूरकरांसाठी आनंददायी असती.
- डॉ. उदयसिंहराजे यादव, राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.