गव्यांमुळे चिकोत्रा खोऱ्यातील शेतकरी अगतिक

Trouble Of Gaur In Chikotra Valley Kolhapur Marathi News
Trouble Of Gaur In Chikotra Valley Kolhapur Marathi News
Updated on

उत्तूर : चिकोत्रा खोऱ्यात जंगल परिसराच्या शेजारी असणाऱ्या बेलेवाडी हुबळगी व झुलपेवाडी (ता. आजरा) परिसरात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. सायंकाळी कळप थेट ऊस, भाजीपाला पिकाचा फडशा पाडतो. राखणीसाठी शेतकरी आता शेतातच मुक्काम करीत आहेत. गव्यांना भीती दाखविण्यासाठी सुतळी बॉंबचा वापर करत आहेत; पण एका शेतात बॉंब फोडले की, गवे दुसऱ्या शेतात जातात. मग बॉंब फोडायचे कुठे-कुठे असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यात रोज सुतळी बॉंबवर 100 ते 500 रुपयांपर्यंत खर्च होत आहे हे वेगळेच. 

झुलपेवाडी येथे जंगलालगत खोरी, माळ व बेलेवाडीला आंब्याचा ओढा व मंगाई नावाच्या शेतात सायंकाळी सात वाजले की गव्याचा कळप जंगलातून उतरतो. कळप आला की शेतकरी पत्र्याचे डब्बे वाजवायला व हाकारी द्यायला सुरवात करतात. सुरवातीला गवे आवाजाने माघारी फिरायचे आता मात्र या आवाजाला ते दाद देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी फटाक, सुतळी बॉंब फोडतात.

बॉंबचा मोठा आवाज झाल्याने गवे निघून जातात. मात्र ज्या ठिकाणी शेतीत राखण नाही त्या ठिकाणी नुकसान सुरू होते. झुलपेवाडीतील मारुती जाधव, पांडुरंग सुतार, सूर्यकांत जाधव, सीताराम खेडेकर, एकनाथ खेडेकर, सुरेश जाधव, हमणंत भंडारी, शंकर जाधव, बंडू जाधव या शेतकऱ्यांच्या उसाचे गव्यांनी नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेलेवाडीचे सरपंच पांडुरंग कांबळे व उपसरपंच सर्जेराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे वनविभागाकडे केली आहे. 

फटाक्‍यांसाठी दररोज 500 पर्यंत खर्च
गव्यांना भीती दाखवण्यासाठी फटाक्‍याचा वापर सुरू आहे; मात्र यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. जास्त शेतकऱ्यांना 100 रूपयापासून 500 रुपये दररोज फटाक्‍यावर खर्च करावे लागतात. 
- नामदेव जाधव, सरपंच, झुलपेवाडी 

आगीमुळे वन्यप्राणी शेतात
झुलपेवाडीतील पाच बेलेवाडीतील दहा व होन्याळीतील एक एकरावरील ऊस गव्याने खाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जंगलाला लागलेल्या आगीमुळे वन्यप्राणी शेतात येऊन पिके खात आहेत. 
- नागेश खोराटे, वनरक्षक 

गटा-गटाने राखण 
सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत गव्यांची राखण करावी लागते. यासाठी शेतकरी गट तयार करतात. प्रत्येक गट सहा तास राखण करतो. गव्याचा कळप दिसला की बॅटरीचा प्रकाशझोत टाकणे, मोठमोठ्यांनी डब्बे वाजवने, फटाके फोडणे हे आता नित्याचे झाले आहे. यामुळे दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेले आहे. 

रात्रभर जागरण
पिकांच्या रखवालीसाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करावी लागते. याचा परिणाम वयस्क शेतकऱ्यांच्या तब्बेदीवर होत आहे. यामुळे वैद्यकीय उपचारासाठीही खर्च करावे लागत आहेत. 
- शांताराम तोरस्कर, बेलेवाडी हुबळगी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.