गडहिंग्लज : कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधित शहरातून स्थलांतरित झालेल्यामुळे ग्रामीण भागात संसर्ग वाढला. तर दुसऱ्या लाटेत संसर्गच स्थानिक होता. त्यामुळे कोणते गाव पहिली लाट रोखण्यात तर कोणते गाव दुसरी लाट थोपविण्यात अपयशी ठरले; पण हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) या छोट्या गावाने मोठी गोष्ट साध्य केली आहे. दोन्ही लाटेमध्ये या गावात एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल.
दरम्यान, तालुक्यातील जांभूळवाडी, हणमंतवाडी व चंदनकूड या गावांनी दुसऱ्या लाटेत अद्याप तरी कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यश मिळविले. शिप्पूर तर्फ नेसरी आणि हेळेवाडी या गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. ७८ कुटुंब संख्या असलेल्या हेळेवाडीची लोकसंख्या ४२५ इतकी आहे. या गावाने दोन्ही लाटेत कोरोनाला वेशीबाहेरच ठेवण्यात यश मिळविले आहे. शिप्पूरमध्ये दोन्ही लाटेत रुग्ण सापडत असताना हेळेवाडीकरांनी मात्र चांगलीच खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.
गावात प्रबोधनावर भर दिल्याने कोरोना नियमांचे पालन केले जात आहे. शिवाय लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जांभुळवाडी हे साडेपाचशे लोकसंख्येचे गाव आहे. पहिल्या लाटेत एकच रुग्ण आढळला होता. आता तर तोही मिळालेला नाही. पहिल्या लाटेत हणमंतवाडीत एक तर चंदनकूडमध्ये पाच रुग्ण मिळाले होते. दुसऱ्या लाटेत तोही मिळणार नाही याची खबरदारी दोन्ही गावांनी घेतली आहे. बाहेरगावच्या लोकांना प्रवेश बंदी केली. प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेतली पाहिजे, हे ग्रामस्थांत बिंबविले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
"हेळेवाडी ग्रामस्थ शेतीकामाला महत्त्व देणारे आहेत. आपले काम भले आणि आपण ही गावची संस्कृती आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा कोरोनापासून खबरदारी घेण्यासाठी झाला आहे."
- बाबूराव शिखरे, सरपंच, शिप्पूर-हेळेवाडी, ता. गडहिंग्लज
दृष्टिक्षेपात गडहिंग्लजची रुग्ण संख्या
पहिल्या लाटेतील रुग्ण १७१३
दुसऱ्या लाटेतील रुग्ण ३००६
सध्या उपचार घेणारे रुग्ण ६१५
मयत झालेले रुग्ण १७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.