आधी लावला लळा, मग घोटला गळा ! मैत्रीला फासला काळीमा

varad Patil
varad PatilSakal
Updated on

बिद्री (कोल्हापूर) : जगातील सगळ्या नात्यांत सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या मैत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासण्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेने सोनाळी ( ता. कागल ) येथील मृत वरद पाटील या मुलाचे नातेवाईक व ग्रामस्थ यांना मोठा धक्का बसला असून गाव अजूनही सून्न अवस्थेत आहे. ज्यांन आपल्या मुलाला लळा लावला त्यानेच त्याचा गळा दाबला यावर अजूनही पाटील कुटूंबियांचा विश्वास बसलेला नाही.

सोनाळीतील रविंद्र पाटील हे शेतकरी असून पत्नी, आई, वडिल, सात वर्षांचा मुलगा वरद आणि सात महिन्यांचा लहान मुलगा अशा सहा जणांचे कुटूंब सर्वसामान्य आयुष्य जगतात. शेती हाच उत्पन्नाचा स्त्रोत असणाऱ्या या कुटुंबाचे गल्लीत आणि गावातही सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. शेतीकामाच्या निमित्ताने त्यांचा गावातील दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य यांच्याशी संपर्क होता.

रविंद्र आणि दत्तात्रय शेतीच्या कामासह वैयक्तिक कामांसाठीही नेहमी एकत्र असायचे. त्यामुळे त्यांची एकमेकांच्या घरी नेहमीच ऊठबस होती. दोघांच्या कुटूंबांतही जिव्हाळा असल्याने एकमेकांच्या घरी हक्काने खाण्यापिण्यासाठी ते कधीच संकोच करायचे नाहीत, एवढी जिवलग मैत्री दोघांत होती. गेल्या सोमवारी ( दि. १६ रोजी ) रविंद्र यांच्या घरी आयोजित श्रावण पुजेलाही दत्तात्रय सपत्नीक हजर होता. पाटील कुटूंबियांनी त्या दोघांना पेहरावा करुन आग्रहाने भोजनही दिले.

मंगळवारी रविंद्र यांच्या सासऱ्यांनी सावर्डे बुद्रुक येथे नविनच बांधलेल्या घराच्या वास्तूशांतीसाठी वरदचे कुटूंबिय चालले असताना, रविंद्र यांनी आपला मित्र दत्तात्रय यालाही बोलावून घेतले. वरद रात्री जेवल्यानंतर आठच्या सुमारास दत्तात्रयने त्याला दुकानातील खाऊ देण्याच्या आमिषाने बाजूला नेले आणि कोणाला काही कळायच्या आतच त्याने आपला डाव साधला आणि आपण काही केलेच नाही या अविर्भावात तो रविंद्र यांच्यासोबत वरदच्या शोधमोहिमेत सहभागी झाला होता.

varad Patil
'वरद'च्या न्यायासाठी सोनाळी, सावर्डेच्या हजारो महिलां रस्त्यावर

मागील चार दिवसांपासून वरदचा शोध घेणाऱ्या कुटूंबियांना शुक्रवारी, त्याचा मृतदेह सापडल्याची बातमी कळाली आणि मनात दाबून धरलेला त्यांचा हुंदका बाहेर पडला. परंतू आपल्या मुलाला मारणारा दुसरा - तिसरा कोणी नसून आपला जिवलग मित्र दत्तात्रय वैद्यच असल्याचे समजताच रविंद्र यांच्या पायाखालची वाळूच सरकली.ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याने आपल्या कुटूंबियांचा विश्वास मिळवला आणि विशेष म्हणजे आपल्या मुलाला लळा लावला, त्यानेच आपल्या मुलाचा गळा दाबला यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

माझ्या मुलाचा गळा दाबताना तुला आपल्या मैत्रीची जराही आठवण का आली नाही?, त्याचा खुन करुन तुला काय मिळाले ?, असे एक ना अनेक प्रश्न रविंद्र हुंदके देत विचारत होते. दत्तात्रयने केलेला गुन्हा मैत्रीला आणि माणुसकीला काळीमा फासणारा असून, अशा नराधमाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नसल्याची प्रतिक्रिया परिसरात ऐकावयास मिळत होती.

सोशल मिडियाही हळहळला

वरद मंगळवारी रात्रीपासून हरवल्यानंतर ते त्याचा मृतदेह सापडेपर्यंत सोशल मिडियातून त्याच्या विषयीच्या पोस्ट सर्वत्र फिरत होत्या. शुक्रवारी सकाळी त्याचा खुन झाल्याची बातमी समजल्यावर तर त्याला श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट अनेकांनी आपल्या मोबाईलवर लावल्या होत्या. सात वर्षीय वरदचा असा अमानुष खुन झाल्याने सोशल मिडियातून दिवसभर हळहळ व्यक्त होत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()