Summer Vacation : गावं एकवटतात, सुसंस्कारित पिढी घडवतात

शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी सुरू,उन्हाळी शिबिरांना मोठा प्रतिसाद
summer vacation
summer vacation sakal
Updated on

शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी सुरू झाली की, उन्हाळी शिबिरांना उधाण येते आणि पुढे महिनाभर अशा शिबिरांना मोठा प्रतिसादही मिळतो. वारकरी सांप्रदायाने मात्र याच सुटीच्या काळात सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आपेगावच्या श्री ज्ञानेश अध्यात्म विद्या संस्था माऊली जन्मक्षेत्र संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात गेल्या बारा-तेरा वर्षांपासून बालसुसंस्कार शिबिरांना प्रारंभ झाला.

प्रत्येक वर्षी एका गावात तब्बल वीस दिवसांच्या निवासी शिबिराचे आयोजन केले जाते आणि यानिमित्ताने संयोजक असणारी सारी गावं एकवटतात. सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी आपापल्या परीने सेवा देतात. यंदा करवीर तालुक्यातील वाकरे या गावात हे शिबिर होणार असून वैशाख शुद्ध व्दादशीला म्हणजेच दोन मेला या शिबिराला प्रारंभ होणार आहे आणि २१ मेला शिबिराची सांगता होणार आहे.

ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर, अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सांप्रदायातील राज्यभरातील मान्यवर मंडळीही यानिमित्ताने एकवटणार असून ही मंडळी शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. अर्थात सलग वीस दिवस ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ चा अखंड गजर अनुभवायला मिळणार आहे.

तेरा वर्षांपूर्वीची संकल्पना

समाजातील मूल्यांचा ऱ्हास आणि साहजिकच त्यामुळे विकृती वाढू लागली आणि म्हणूनच नव्या पिढीला योग्य दिशा देण्याची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रत्येक मे महिन्यात असे शिबिर घ्यावे, अशी संकल्पना पुढे आली आणि शिबिरांना प्रारंभ झाला. पहिल्या वर्षी करवीर तालुक्यातील आरे गावात शिबिर झाले आणि तेथून पुढे मग प्रत्येक वर्षी एका गावात असे आजवर अकरा गावांत शिबिरांचे आयोजन झाले. यंदा वाकरे येथे शिबिर होत आहे. सुरुवातीला शंभरावर शालेय विद्यार्थी सहभागी व्हायचे आणि साठ ते सत्तर विद्यार्थी संपूर्ण शिबिर पूर्ण करायचे;

पण आता सहभागी शिबिरार्थींची ही संख्या दुप्पट झाली आहे. शिबिरार्थींना भोजन, निवासासह आवश्यक सर्व सुविधा संयोजकांकडून दिल्या जातात. प्रवेश क्षमतेचा विचार करता नाममात्र शुल्क घेतले जाते. सुरुवातीला आम्हालाच सर्व तयारी करावी लागायची; पण आता प्रत्येक गावात शिबिराची माहिती असल्याने संपूर्ण गावच संयोजनासाठी एकवटते. नदीच्या प्रवाहापासून पुढे समुद्र बनतो, तशीच या बालसुसंस्कार अाध्यात्मिक शिबिराची व्याप्ती आता वाढू लागल्याचे भानुदास महाराज कोल्हापूरकर सांगतात.

नगरप्रदक्षिणा आणि दिंडी सोहळाही

प्राणायाम, योगासने, वैदिक तथा सांप्रदायिक प्रार्थना, सुभाषिते, हरिपाठ, हनुमान चालिसा, भगवद्‌गीता, विष्णूसहस्त्रनाम, पखवाज, तबला, हार्मोनियम, सकल संतचरित्र कथा, रामायण आदी विषयांवर शिबिरात मार्गदर्शन होते. विविध विषयांवरील व्याख्यानांचाही समावेश असतो. सकाळी साडेसहा ते रात्री आठ या वेळेत रोज विविध सत्रे होतात. शिबिराच्या सांगतेनिमित्त नगरप्रदक्षिणा आणि दिंडी सोहळ्याचेही आयोजन केले जाते. यानिमित्ताने पंचक्रोशीतील वारकरी मंडळीही एकवटतात.

थोडक्यात, विविध विषयांवरील उन्हाळी शिबिरे सर्वत्र होत असली तरी साऱ्या गावानं मिळून नव्या पिढीला सुसंस्कारित करणं, हेच या बालसुसंस्कार आध्यात्मिक शिबिराचे वेगळेपण आहे. कोल्हापुरातील वारकरी परंपरा तीनशेहून अधिक वर्षांची आहे आणि अशा शिबिरांतून घडणारी नवी पिढी हीच परंपरा नेटाने पुढे सुरू ठेवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.