विशाळगडावरील 'अतिक्रमण'ला हिंसक वळण; सात अधिकाऱ्यांसह 12 पोलिस अन्‌ 6 नागरिक जखमी, गजापुरात घरांची जाळपोळ

या प्रकारात काही ठिकाणी तलवारी, कोयते, कुदळ यांचाही वापर करण्यात आला.
Vishalgad encroachment Dispute
Vishalgad encroachment Disputeesakal
Updated on
Summary

गजापुरात झालेल्या दगडफेकीत दहा चारचाकी, दहा ते पंधरा दुचाकी वाहनांचे तर पंधरा घरांचे मोठे नुकसान झाले.

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटावासाठी (Vishalgad Encroachment Removal Campaign) हिंदुत्ववादी संघटनांसह (Hindu Organization) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईला हिंसक वळण लागले. प्रत्यक्ष गडावर पोलिसांनी कोणालाही सोडले नाही; पण त्याचवेळी संतप्त जमावाने गडाला लागून असलेल्या गजापुरात काही घरे पेटवून दिली. दारात लावलेल्या गाड्यांवर तुफान दगडफेक करून काही चारचाकी गाड्या उलथून टाकल्या. एका घराला लावलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला, त्याच घरात अन्य चार भरलेली सिलिंडरही होते; पण वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, या प्रकारात काही ठिकाणी तलवारी, कोयते, कुदळ यांचाही वापर करण्यात आला. या प्रकाराने विशाळगडासह गजापुरात (Gajapur) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेनंतर या परिसरातील पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Vishalgad encroachment Dispute
Vishalgad encroachment Dispute

गजापुरात झालेल्या दगडफेकीत दहा चारचाकी, दहा ते पंधरा दुचाकी वाहनांचे तर पंधरा घरांचे मोठे नुकसान झाले. बऱ्याच घरातील फर्निचर, प्रापंचिक साहित्य रस्त्यावर आणून फेकले व त्याची मोडतोड करण्यात आली. या घटनेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक अप्पासाहेब पोवार, जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह नऊ कर्मचारी जखमी झाले. श्री. झाडे यांना गंभीर दुखापत झाली.

Vishalgad encroachment Dispute
Vishalgad encroachment Dispute

विशाळगडावर सुमारे १५८ अतिक्रमणे आहेत. यापैकी सहा अतिक्रमणांबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयीन वाद असलेली अतिक्रमणे सोडून अन्य अतिक्रमणे काढावीत, यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून कोल्हापुरात मोर्चेबांधणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात संभाजीराजे छत्रपती यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी आज विशाळगडावर जाऊन ही अतिक्रमणे हटविण्याचा इशारा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगडावर जाणार असल्याचे त्यांनी शनिवारी जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर काल रात्रीपासूनच विशाळगडासह पायथ्याला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आज सकाळी पोलिसांना चकवा देऊन प्रत्यक्ष गडावर केलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी असलेल्या मुख्य धार्मिक स्थळावर दगडफेक केली. या संतप्त जमावाला पोलिसांनी बळाचा वापर करून खाली पाठवले. या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास संभाजीराजे गडावर पोचले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते. पोलिसांनी त्यांना गडाच्या पायऱ्याजवळ अडवले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्याचे मुख्यमंत्री जोपर्यंत तत्काळ अतिक्रमणे काढण्याचे आदेश देत नाहीत, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

Vishalgad encroachment Dispute
Vishalgad encroachment Dispute

जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांच्याशी संवाद साधला, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून दिला. ज्या अतिक्रमणांचे वाद न्यायालयात आहेत, ती सोडून उर्वरित अतिक्रमणे काढण्याचे काम सोमवार (ता. १५) पासून सुरू करतो, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनद्वारे संभाजीराजांना दिले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना गड सोडण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना गड सोडण्याची विनंती केली.

प्रचंड नासधूस

संभाजीराजे व पोलिस, प्रशासनात चर्चा सुरू असताना विशाळगडाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिस वर सोडत नसल्याने संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांनी पायथ्याला लागून असलेल्या गजापुराकडे आपला मोर्चा वळवला. गजापुरातील घरांवर दगडफेक सुरू केली. दारात लावलेल्या दुचाकी, चारचाकी वाहने उलथून टाकली. त्यांची मोडतोड केली. तेथीलच धार्मिक स्थळांवर त्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. यात एका घराला आगही लावण्यात आली, तसेच या परिसरातील लहान स्टॉलधारकांच्या स्टॉलची मोडतोड करून त्यांचे साहित्यही विस्कटून टाकले. या ठिकाणी घरात महिला, लहान मुले, वृद्ध होते. अचानक या घटनेने ते सर्वजण भयभीत झाले. या घटनेमुळे रस्त्यावर विटा, दगडांचा खच पडला होता. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थितीत नियंत्रणाखाली आणली.

Vishalgad encroachment Dispute
Vishalgad encroachment Dispute

विशेष पोलिस निरीक्षकांची भेट

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित हे सकाळपासूनच पायथ्याला थांबून होते. संभाजीराजे यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर झालेल्या हिंसक घटनेची माहिती मिळताच विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही घटनास्थळी भेट घेऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत श्री. पंडित यांच्यासह फुलारी हे शाहूवाडी पोलिस ठाण्यात ठिय्या मारून होते.

विटा, दगडांचा खच

घटनेनंतर गजापूर ते विशाळगड मार्गावर विटांसह दगड, काठ्यांचा खच पडलेला पाहायला मिळाला. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील तसेच स्थानिक तरुणांपेक्षा पुणे, पिंपरी-चिंचवड व अन्य जिल्ह्यातील तरुणांची मोठी संख्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.