एखादा उद्योजक आमदार झाल्यानंतर कशापद्धतीने काम करू शकतो हे त्यांनी अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत दाखवून दिले.
आमदार चंद्रकांत जाधव यांचा काम करण्याचा धडाका वेगळाच होता. गेल्याच आठवड्यात एअर अँब्युलन्समध्ये बसण्यापूर्वी हैदराबादकडे रवाना होता होता त्यांनी शहरातील गांधी मैदान, दुधाळी पॅव्हेलियन, कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानासाठी निधी मिळण्याच्या प्रस्तावांचा पाठपुरावा केला होता. क्रीडा व युवक कल्याण मंत्री, अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्कही साधला. प्रकृती खालावली असतानाही शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांचा पाठपुरावा अण्णांनी केला. एखादा उद्योजक आमदार झाल्यानंतर कशापद्धतीने काम करू शकतो हे त्यांनी अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत दाखवून दिले.
चंद्रकांत जाधव हे मुरब्बी राजकारणी नव्हते. पण, विकासाचा ध्यास असलेले सच्चे कार्यकर्ते होते. लोकप्रतिनिधी झाल्यापासून त्यांनी विकासकामाचा ध्यास घेतला. शहरातील रस्त्यांचा प्रश्न बिकट बनला असताना पुन्हा नवा डीपीआर द्यावा असे सल्लागार सांगत असतानाच जाधव यांनी माजी आमदारांनी यापूर्वी काही प्रस्ताव दिले आहेत का याची माहिती घेतली. त्यावेळी तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांनी काही प्रस्ताव दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नवा प्रस्ताव देऊन पुन्हा एक-दोन वर्षाचा कालावधी जाण्यापेक्षा क्षीरसागर यांच्या प्रस्तावाचाच पाठपुरावा केला तर ही कामे लवकर होतील असे ध्यानात आले. जाधव यांनी त्याच जुन्या १७८ कोटींच्या प्रस्तावांचा पाठपुरावा केला. त्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील रस्त्यांसाठी २०३ कोटींचा निधी दिल्याचे सर्वच लोकप्रतिनिधींसमोर सांगितले. या वेळी आमदार जाधव, माजी आमदार क्षीरसागर हे दोघेही उपस्थित होते. राजकारणात श्रेयवाद असतोच. पण, त्याही पलीकडे जाऊन शहराच्या विकासासाठी जाधव यांनी प्रयत्न केले.
कोल्हापूर उत्तर हा शहरी भागाचा समावेश असणारा मतदारसंघ. येथील नेमक्या अडचणींबाबत ते नेहमी महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा करायचे. महापालिकेत सर्वाधिक बैठका घेणार आमदार म्हणून अण्णांचा उल्लेख करावा लागेल. महापालिकेचा प्रत्येक विभाग सक्षम व उत्पन्न मिळवून देणारा असावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोरोना काळात रुग्णवाहिका, शववाहिकाची कमतरता दूर करण्यासाठी जाधव यांनी निधी खर्च केला.
अण्णांमुळे महापुरानंतर लवकर पाणीपुरवठा सुरू
२०१९ नंतर २०२१ लाही मोठा महापूर आला. या वेळी महापालिकेची केंद्र पाण्याखाली गेली. त्यामुळे दीर्घकाळ पाणीपुरवठा बंद राहिला. पण, पाणीपुरवठा लवकर सुरू होण्यासाठी जाधव यांनी शिंगणापूर, बालिंगा उपसा केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते उद्योजक असल्यामुळे बरेच तांत्रिक ज्ञान त्यांना होते. त्याद्वारे त्यांनी महापालिकेला सर्व तांत्रिक सहकार्य करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मोठे योगदान दिले. विशेष म्हणजे सर्वसामान्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत राहून त्यांनी हे काम करून घेतले. पुराच्या पाण्यात जाणारी पाणी योजनांची विद्युत उपकरण काही उंचीवर घेण्यासाठी निधी मिळावा यासाठीही त्यांनी ॲम्बुलन्सकडे जाता जाता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या खात्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.