कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल (ता. 7) रात्री बारा ते आज रात्री बारापर्यंत 332 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील आजवरच्या बाधितांचा आकडा 10 हजार 268 इतका झाला. आज दिवसात 12 जणांचा मृत्यू झाला; तर 170 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यानुसार आजवर एकूण चार हजार 121 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. एकूण पाच हजार 886 कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
उपचार घेणाऱ्या बाधितांत 62 व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील सहा शासकीय रुग्णालयांत झालेल्या तपासणीतून एक हजार 145 व्यक्तींचे स्वॅब घेतले आहेत. त्याचे अहवाल दोन दिवसांत मिळतील, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. चार दिवसांपासून शेंडा पार्क येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेतून निर्जंतुकीकरणाचे काम सुरू असल्याने स्वॅब तपासणीचे काम थांबले होते. याचवेळी जिल्ह्यातील 14 कोविड सेंटरवर रोज येणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. कोरोनोची लक्षणे असणाऱ्यांचे स्वॅब घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, शासकीय प्रयोगशाळेतील स्वॅब तपासणी तूर्त बंद आहे. त्यामुळे मंगळवार (ता. 4) ते काल (ता. 9)पर्यंतचे बहुतांश स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा व कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तीन खासगी प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले होते. त्यांची संख्या जवळपास दोन हजार 300 पेक्षा जास्त होती. त्याचे गेल्या 24 तासांत तपासणी अहवाल येत आहेत. त्यात काल रात्री बारा ते आज रात्री बारा या कालावधीत 332 स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरात दिवसभरात 245 रुग्ण आढळले. यामधील सर्वाधिक 30 रुग्ण राजारामपुरीतील आहेत. शिवाजी पेठेत 20, मंगळवार पेठेमध्ये 15 तर कसबा बावड्यात 10 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या 2604 झाली आहे. दिवसभरात सातजणांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण 61 जणांचे मृत्यू झाले आहेत.
आजपर्यंत एका दिवसात शहरात 225 रुग्ण आढळल्याचा सर्वाधिक आकडा होता. मात्र तब्बल 245 रुण आढळल्याने आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा ठरला. संभाजीनगर येथे 14, जवाहर नगर, सदरबाजारमध्ये प्रत्येकी 10, राजेंद्रनगर, गंगावेश आणि सोमवार पेठ येथे प्रत्येकी 9 रुग्ण आढळले आहेत. मंगळवार पेठ, मातंग वसाहत, सानेगुरूजी वसाहत, दौलतनगर, नागाळा पार्क, रविवार पेठ, लक्षर्तीर्थ वसाहत या भागांमध्ये प्रत्येकी एक कोरोना संशयीतांचा मृत्यू झाला. गेल्या पंधरा तीन आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. वाढता मृत्यूदरही चिंतेचा विषय ठरू लागला. अहवाल पॉझिटीव्ह येणारे कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील आहेत.
शववाहिका वेटिंगवर
अग्निशमन दलाकडे सध्या दोन शववाहिका आहेत. पंचगंगा स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्यांसाठी अंत्यसंस्कार होतात. शववाहिकेवर मोठ्या प्रमाणावर ताण येऊन चालक जीव धोक्यातून घालून कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा पार्थिव स्मशानभुमीत पोहचवत आहेत. एखाद्या रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्यास पार्थिव ताब्यात देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शववाहिका वेटींगवर राहत आहेत.
शहरातील भागवार एकूण रुग्ण संख्या
शरद पवार आज घेणार कोल्हापूरचा आढावा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार उद्या (ता. 9) कऱ्हाड येथे येणार आहेत. तेथील बैठकीत ते कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि महापूर याबाबतची माहिती घेणार आहेत. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह "राष्ट्रवादी'चे जिल्ह्यातील पदाधिकारी, शासकीय अधिकारीही उपस्थित असणार आहेत. कऱ्हाड येथे होणाऱ्या बैठकीत शरद पवार राजकीय विषयांबरोबरच सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रश्नांवरही माहिती घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्याची स्थिती
संपादन : विजय वेदपाठक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.