कोल्हापूर - उत्तरेतला सतपाल ताकदीचा पैलवान, त्याला हरविण्याची जिद्द बाळगली. पैलवान युवराज पाटीलचा पहाटे चारपासून सराव सुरू केला. माझ्या नियमांबाबत त्याची कुठलीच तक्रार नव्हती. त्याने एकदा नव्हे, तीन वेळा सतपालला हरवले. आमच्या कष्टाचे चीज झाले. मात्र, आम्ही घडवलेल्या पैलवानाची अंत्यदर्शन घेण्याची वेळ माझ्यावर आली. तो माझा मानसपुत्र होता. आज तो हयात नसला, तरी माझा कुस्तीतला संघर्ष संपलेला नाही.
नवोदित पैलवानांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे, ‘दादा उर्फ वस्ताद बाळ गायकवाड कुस्तीतल्या अनुभवांचा खजिना रिता करत होते. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचा कोल्हापुरी बाणा कायम आहे. ‘प्रसिद्धी नशा आहे. एकदा डोक्यात गेली की ती दारूपेक्षा वाईट’, असे ते सांगत होते. लहानपणापासूनच्या कुस्तीतील प्रवासाची माहिती देत होते.
बड्या पैलवानांचे संस्कार...
जिनाप्प्पा अकिवाटे त्या काळातला मोठा पैलवान. त्याला अंघोळीसाठी वेळ लागायचा. त्याची अंघोळ झाल्यावर छोट्या पैलवानांचा नंबर लागायचा. त्यामुळे छोटे पैलवान लंगोट पाण्याच्या हौद्याच्या नळाला अडकवून जायचे. जिनाप्पा ते लंगोट धुऊन टाकायचे आणि पैलवानांना तो कोठे वाळत टाकलाय, हेही सांगायचे. देवासमान पैलवानांचे संस्कार माझ्यावर झाले. तेच माझ्या खडतर आयुष्याचे टॉनिक आहे.
बहिणीने लहानाचे मोठे केले...
आजोबा गणपतराव गायकवाड वस्ताद होते. वडील राजाराम सुद्धा पैलवान होते. मोतीबाग तालमीत मी कुस्तीचे धडे घेतले. तिथल्या मोठ्या पैलवानांचे संस्कार माझ्यावर झाले. माझ्या आईचे सहा महिन्यांचा असताना निधन झाले. थोरली बहीण नर्मदा इंगवले हिने मला लहानाचे मोठे केले, असेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.
१३ वर्षे संघर्ष...
मोतीबाग संस्थानची तालीम. या तालमीसाठी १३ वर्षे एका दाव्यात होतो. त्याचा मानसिक त्रास खूप झाला. वकील तालमीचा असल्यामुळे दावा जिंकणार, याची खात्री होती. कुस्तीसाठी वाहिलेल्या आयुष्याचे अखेर सार्थक झाले. आज तालमीचे पैलवान गावा-गावातली मैदाने जिंकतात. शिवाय वेगवेगळ्या किताबाचे मानकरी ठरत आहेत.
तारेवरची कसरत...
खरी कॉर्नरला तालमीचे कार्यालय होते. त्याच्या मागे एक मोलकरीण तिच्या लहान मुलासह राहत होती. तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याने मुलगा पोरका झाला. त्याची जबाबदारी मी घेतली. तो मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला मराठा बॅंकेत क्लार्क म्हणून नोकरी मिळाली. पुढे तो ब्रॅंच मॅनेजर झाला. एकीकडे कुस्ती आणि दुसरीकडे त्याची देखभाल ही तारेवरची कसरत होती.
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.