मिरजमाल बापूजींनी "संत तुकाराम'सह अनेक सिनेमांतून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अजरामर

‌ Mirajmal Bapuji played the role of Chhatrapati Shivaji Maharaj in many movies including "Sant Tukaram"
‌ Mirajmal Bapuji played the role of Chhatrapati Shivaji Maharaj in many movies including "Sant Tukaram"
Updated on

कोल्हापूर :  चित्रपट-संत तुकाराम...जागतिक पातळीवर सुवर्णकमळ मिळवणारा पहिला मराठी सिनेमा. चित्रपटात एक प्रसंग आहे. संत तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू असते आणि त्याच वेळी आपल्याला पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमिका साकारणारे कोण ? ते होते, मिरजमाल हैदर मुजावर. मुजावर रहायला बाबूजमाल दर्ग्यासमोरच्या गल्लीत. त्यांच्या आठवणी आजही ज्येष्ठ मंडळी सांगतात. छत्रपती शिवरायांची भूमिका करायची म्हंटलं की त्यांच्यात जणु सळसळता उत्साह संचारायचा आणि मिळालेली प्रत्येक भूमिका त्यांनी अजरामरच केली, असे ही मंडळी आजही आवर्जून सांगतात. 
प्रभात फिल्म कंपनीच्या "संत तुकाराम' सिनेमांत मुजावर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भेटले, तसेच "सिंहगड', "रायगड' या सिनेमांत आवश्‍यक तेथे "डमी' म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचीच भूमिका साकारली. बाबूजमाल दर्गा परिसरच नव्हे तर कोल्हापुरात ते "बापूजी' या नावाने सर्वपरिचित. अनेक सिनेमांसाठी रेकॉर्डिस्ट म्हणूनही त्यांनी काम पाहिले. "सैरंध्री', "संत ज्ञानेश्‍वर', "शेजारी', "कुंकू', "पेडगावचे शहाणे', "धर्मात्मा', "चॉंद', "पडोसी' आदी सिनेमांसाठी त्यांनी रेकॉर्डिस्ट म्हणून काम केले. 1926 ते 1948 या काळात "प्रभात'सह कोल्हापूर सिनेटोन, मद्रास फिल्म्स कंपनी या सिनेनिर्मिती कंपनीच्या माध्यमातून त्यांनी कलेची इमाने-इतबारे सेवा केली. 
मराठी सिनेमांचा सुवर्णकाळ असताना त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रमुख भूमिकेत त्या काळातील काही नावाजलेले कलाकार असायचे; पण छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा असला की त्यात साहसी दृश्‍ये स्वाभाविकच. अशा वेळी मग मुजावर यांनीच हे काम करावे, असा दिग्दर्शकांचा आग्रह असायचा. पुढे 1997 पर्यंत त्यांनी बाबूजमाल दर्ग्याचे विश्‍वस्त म्हणूनही काम पाहिले. 

त्याग व समर्पणाचा सण... 
मोहरम म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेला सण. बाबूजमाल दर्ग्यात आज (शुक्रवारी) मानाच्या नाल्याहैदर पंजाची प्रतिष्ठापना होईल आणि त्यानंतर सर्वत्र पंजांची प्रतिष्ठापना केली जाईल. महम्मद पैगंबर यांचे नातू हसन व हुसेन बगदाद येथील करबला येथे हुकूमशहा यास्जिद याच्याविरुद्ध लढताना शहीद झाले. त्यांचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो. त्यासाठी पंजांची प्रतिष्ठापना होवून पंजांची भक्तिभावाने सेवा केली जाते. दहाव्या दिवशी पंजांचे विसर्जन केले जाते. इस्लाम धर्मात त्याग आणि समर्पणाचा हा उत्सव असला तरी येथील मोहरम उत्सवाला सामाजिकतेची झालर आहे आणि अनेक पंजांना दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. मोहरम आणि कोल्हापूर पोलिस मुख्यालय हीही एक वेगळी परंपरा आहे. लाईन बाजारमधील पीर गल्लीत पंजाची प्रतिष्ठापना केली जाते. या पंजाला पोलिसांच्या सलामीची परंपरा बदलत्या काळातही जपली गेली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.