कुंडल - कुंडल जिल्हा परिषद गटात शरद लाड व महेंद्र लाड यांच्यातच पुन्हा ‘काँटे की टक्कर’ होणार काय, याकडे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षण निश्चितीनंतर कुंडल गट खुला झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाल्याचे दिसते आहे. कुंडलसह घोगाव, दह्यारी, तुपारी, आंधळी या गावांत संभाव्य लढतीचीच चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या वेळेप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड व सांगली जिल्हा बँकेचे संचालक, काँग्रेसचे नेते महेंद्र लाड यांच्यातच पुन्हा लढत होणार काय, याची उत्सुकता लागून राहिली आहे. मागील वेळी शरद लाड व महेंद्र लाड यांच्यात जोरदार लढत झाली होती. त्या वेळी प्रत्येक मतदारापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले होते. समाजमाध्यमांसह शक्य अशा सर्व माध्यमांतून दोन्हीही पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.
मागील निवडणुकीत शरद लाड यांनी मताधिक्याने विजय मिळवला. आता कुंडल गटाची रचना बदली आहे. मागील वेळची बांबवडे, मोराळे, सांडगेवाडी ही गावे सावंतपूर गटात समाविष्ट झाली आहेत. तुपारी, दह्यारी, घोगाव यांचा कुंडल गटात समावेश झाला आहे. बदललेल्या रचनेचा कोणाला लाभ होणार, हा प्रश्न आहे. मागील वेळी भाजप व राष्ट्रवादीची युती होती. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची शरद लाड यांना साथ होती. मात्र नंतर राजकीय घडामोडी झाल्या.
‘पुणे पदवीधर’च्या निवडणुकीत आघाडीचे अरुण लाड व भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात लढत झाली. पुलाखालून बरेच पाणी गेल्याने एकेकाळी देशमुखांशी असलेले मित्रत्वाचे संबंध आता दिसत नाहीत. भाजप येथे कोणती भूमिका घेणार? स्वतंत्र उमेदवार देणार की कोणाला बळ देणार, याकडे लक्ष लागून आहे. मागील वेळी महेंद्र लाड यांच्या पराभवामुळे काँग्रेसला धक्का बसला होता. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीनंतर लगेचच कुंडल ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.
आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवादपणे बहुमत मिळवून सत्ता आणणार, असेच चित्र होते. मात्र महेंद्र लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या १७ पैकी ९ सदस्य निवडून आणून कुंडलला सत्तांतराची कामगिरी केली. त्यामुळे महेंद्र लाड गटास पुन्हा उभारी मिळाली. मात्र सरपंच निवड थेट जनतेतून होती. राष्ट्रवादीच्या प्रमिला पुजारी सरपंच झाल्या. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महेंद्र लाड बिनविरोध विजयी झाल्याने समर्थकांतही उत्साह आहे.
आघाडीची शक्यता अशक्य
कुंडल गटात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणे सध्या तरी अशक्य वाटते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार अरुण लाड यांचे बंधू किरण लाड यांचा पराभव झाला. तो लाड गटाच्या जिव्हारी लागला. काँग्रेसच्या विश्वासघातकी राजकारणामुळेच पराभव झाल्याचा आरोप आमदार अरुण लाड यांनी केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी नको, अशी मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे नेत्यांनी आघाडी केली तरी कुंडल गटात कितपत राहणार, हा प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.