मिरज - मिरजेतून कोल्हापूर, कागवाड आणि सांगली या मार्गावरील एसटी वाहतूक अजूनही बंदच आहे. कोल्हापूर रस्त्यावर अंकली व उदगावमध्ये रस्ता खचल्याने एसटी सोडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे तीनही मार्ग एसटीसाठी चांगल्या उत्पन्नाचे व अत्यंत महत्वाचे आहेत, पण आठवभडारापासून त्यावर एकही गाडी धावलेली नाही. अंकली व उदगावमध्ये रस्त्यावर महापूराचे पाणी आल्याने एसटी बंद ठेवावी लागली.
सोमवारी (ता. 12 ) पाण्याला काहीसा उतार मिळाला. आज सकाळी रस्ता दिसू लागल्याने एसटी सोडण्याचा प्रयत्न अधिकार्यांनी केला, पण रस्ता खचल्याचे दिसून आले. शिरोळच्या तहसिलदारांनी कळवले कि अंकली व उदगाव येथे रस्ता बराच खचल्याने एसटी वाहतूक सुरु करु नये. भराव टाकण्याचे काम गतीने सुरु आहे, ते पुर्ण झाल्यावरच गाड्या सोडाव्यात.
मिरजेतून कर्नाटकात जाण्यासाठी महत्वाचा असणारा मिरज-कागवाड रस्ताही आठवडाभरापासून पाण्याखाली आहे. म्हैसाळजवळ सात फुटांहून अधिक पाणी असल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद राहीली. कर्नाटक परिवहनने लांब पल्ल्याच्या काही गाड्या बेडग - आरगमार्गे सोडल्या. आज (ता. 13 ) संध्याकाळीही सुमारे तीन फूट पाणी रस्त्यावर होते. रात्रभरात ते कमी होऊन बुधवारी सकाळी वाहतूक सुरु होईल अशी अपेक्षा आहे.
शहर बसवाहतुकीसाठी महत्वाचा रुट असणारा मिरज - सांगली रस्ताही सध्या बंदच आहे. सांगलीत आंबेडकर स्टेडीयमपर्यंत पाणी आल्याने तसेच मुख्य बस्थानकात पाणी उभे राहील्याने बससेवा ठप्प झाली. आता रस्ता खुला झाला असला तरी वाहतूक अद्याप सुरु झालेली नाही.
रेल्वे व एसटी बंदमुळे प्रवाशांची पूरकोंडी
मिरजेतून कोल्हापूरची एसटी आणि रेल्वे या दोन्ही सेवा बंद राहील्याने प्रवाशांना अतोनात त्रास सोसावा लागत आहे. अनेकजण मिरज आणि कोल्हापुरात अडकून पडले आहेत. कोल्हापुरला सांगली-मिरजेतून हजारभर लोक दररोज नोकरी व शिक्षणानिमित्त जातात, त्यांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.