बेळगाव : विधान परिषदेच्या सलग दुसऱ्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला दणका बसला. हक्काची एक जागा गमावावी लागली. विधान परिषदेच्या तीन जागांपैकी भाजपने दोन व कॉंग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार मतदार संघातून माजी खासदार आणि कॉंग्रेस उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी बाजी मारली. यामुळे भाजप उमेदवार अरुण शहापूर यांची ‘हॅट्रीक’ हुकली. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक घोषित झाली होती. पैकी तीन मतदार संघातील मतमोजणी बेळगावात होती. ज्योती कॉलेज येथे आज (ता.१५) सकाळी मतमोजणी झाली. या निवडणुकीत काही अपेक्षित व अनपेक्षित निकाल हाती आले. भाजपला परत एकदा अंतर्गत दुफळी आणि मतभेदाचा फटका बसला.
वायव्य शिक्षक मतदार संघातील हक्काची जागा कॉंग्रेसने अक्षरशाः खेचून आणली. विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महांतेश कवठगीमठ यांच्या पराभवाची धूळ अद्याप खाली बसली नाही. त्यावरून आरोप व प्रत्यारोप सुरु आहे. यात वायव्य शिक्षक संघातील भाजप उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे कॉंग्रेस गोटामध्ये परत एकदा चैतन्य संचारले. कॉंग्रेस उमेदवार हुक्केरी यांनी मुसंडी मारत कॉंग्रेसच्या पारड्यात विजय घातले. त्यामुळे भाजप आणि पर्यायाने शहापूर यांना जिव्हारी लागणारा निकाल ठरला. पैशाच्या महापुरापुढे माझा पराभव झाल्याचे शहापूर यांनी सांगितले तरी हुक्केरी यांनी लढत एकतर्फी केली. या मतदार संघात २१ हजार ४०२ जणांनी मतदान केले होते. त्यापैकी ११,४६० मते हुक्केरी यांनी घेतली. शहापूर यांना ६,४०५ मते पडली. यामुळे हुक्केरी यांनी ५,०५५ मताधिक्यांनी विजय मिळविला. त्यामुळे श्री शहापूर यांची हॅट्रीक हुकली आहे.
बसवराज होरट्टी यांचा विक्रमी विजयी
विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी विधान परिषद पश्चिम शिक्षक मतदार संघात सलग आठव्यांदा विजय मिळवत विक्रम नोंदविला. पण, या निवडणुकीत श्री होरट्टी भाजप उमेदवारीवर निवडणूक आखाड्यात होते. त्यामुळे पश्चिम मतदार संघात पहिल्यांदा ‘कमळ’ फुलले. वायव्य शिक्षकमधील एक जागा भाजपने गमावली असली तरी होरट्टींच्या माध्यमातून भरून निघाली आहे.
या निवडणुकीच्या तोंडावर होरट्टी यांनी धजदचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप उमेदवारीवर आखाड्यात होते. त्यांच्या प्रवेशाला पर-विरोध दिसला. मतदार आणि नेत्यांची टीका झाली. यामुळे होरट्टीपुढे कडवे आव्हानाची अपेक्षा होती. एकतर्फी विजय मिळविला. मतदार संघात १५,५८३ जणांनी मतदान केले होते. पैकी होरट्टी यांना ९ हजार २६६ मते पडली. प्रतिस्पर्धी उमेदवार बसवराज गुरीकर यांनी ४,५९७ मते घेतली. यामुळे होरट्टी यांनी ४,६६९ मताधिक्यांनी विजय मिळविला.
प्रादेशिक आयुक्त आदित्य आम्लान बिस्वास, जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी निवडणुकीची प्रशासकीय जबाबदारी पार पाडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापक बंदोबस्त होता.
कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघ
उमेदवार मतदान
प्रकाश हुक्केरी ११,४६० (विजयी मताधिक्य ५,०५५ )अरुण शहापूर६४०५
चंद्रशेखर लोणी ५४४
अप्पासाहेब कुरणे ९
चंद्रशेखर गुडसी १०१
जयपाल देसाई १०
एन. बी. बन्नूर १००९
बसप्पा मनीगार ३९
श्रीकांत पाटील १९
श्रीनिवासगौड गौडर ५२४
श्रेणिक जंगटे ८
संगमेश चिक्कनरगुंद ४
वैध मतदान २०१३२
बाद मतदान १२७०
एकूण मतदान २१४०२
कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदार संघ
उमेदवार मतदान
बसवराज होरट्टी ९,२६६ (विजयी मताधिक्य ४,६६९)
बसवराज गुरीकर ४५९७
श्रीशैल गुडाडणी २७३
एमपी करबसप्पा ६०
प्रा. एफ. व्ही. कल्लाप्पा गौडर २७
गोविंदगौडर वेंकनगौडा रंगनगौडा ७९
वैध मतदान १४३६०
बाद मतदान १२२३
एकूण मतदान १५५८३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.