चिक्कोडी : एका घरात दोन पदे, जिल्ह्यात अधिक मंत्रिपदे अशा घटना घडल्या आहेत. पण, कर्नाटकच्या राजकारणात एकाच गावात तीन आमदार व एक खासदार असल्याचे दुर्मीळ उदाहरण घडले आहे. एकसंबा (ता. चिक्कोडी) गावातील राजकीय नेत्यांनी ही किमया करून दाखविली आहे. या चौघांमध्ये सध्या एक मंत्रिपदही आहे. भाजपकडे दोन व काॅंग्रेसकडे दोन पदे असल्याने कोणतीही सत्ता असली तरी गावचे वर्चस्व राहणार आहे.
प्रकाश हुक्केरी हे विधानपरिषदेच्या वायव्य शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचे पुत्र गणेश हुक्केरी हे सध्या चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातील विधानसभेचे आमदार आहेत. हे दोघेही काॅंग्रेसचे जिल्ह्यातील नेते आहेत. तर भाजपचे निपाणी मतदारसंघाच्या आमदार व सध्या राज्याच्या धर्मादाय व वक्फ खात्याच्या मंत्री शशीकला जोल्ले व चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले हे भाजपचे जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. या दोन घरांत दोन पक्षांतील फायरब्रॅंंड नेते असल्याने त्याचा जिल्ह्याच्या राजकारणाला व विकासाला अधिका फायदा होणार आहे.
हुक्केरी व जोल्ले ही दोन्ही घराणी पहिल्यापासून एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. या दोघांची थेट लढत दोनवेळाच झाली आहे. त्यात आमदारकीच्या लढतीत हुक्केरी वरचढ ठरले तर खासदारकीच्या लढतीत जोल्ले वरचढ ठरले आहेत. दोघेही धनाढ्य व बलाढ्य नेते म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात परिचित आहेत. जोल्ले कुटुंब सहकारातून एकसंब्याचे नाव पुढे आणत अलीकडच्या काही वर्षांत त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे. तर हुक्केरी कुटुंब पहिल्यापासून राजकारणात आहे. दोघांच्या राजकीय वैरत्वाला चिक्कोडी-सदलगा मतदारसंघ चांगला परिचित आहे. आपल्या वैयक्तिक निवडणुकीत जेवढी ताकद लावून हे दोन नेते लढतात तेवढीच ताकद दोघेही इतर निवडणुकांसाठी लावतात.
एकसंबा नगरपंचायत छोटीशी असली तरी त्या निवडणुकीची इर्षा अत्यंत टोकाची असते. गेल्यावेळी पहिल्यांदाच एकसंबा नगरपंचायत निवडणूक लागली. त्यावेळी भाजपकडून अण्णासाहेब जोल्ले यांनी धक्कातंत्र देत पहिल्याचवेळी भाजपची सत्ता आणली होती. तर यावेळी झालेल्या निवडणुकीत काॅग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांनी जोरदार भाग घेत एकहाती एकसंबा नगरपंचायतीवर सत्ता राखली. या दोघांच्या इर्षेच्या राजकारणात दोघेही समान तुल्यबळ असल्याचे स्पष्ट होते. एकदा त्यांनी बाजी मारली की दुसऱ्यांदा दुसऱ्यांनी बाजी मारली हा शिरस्ता झाला आहे.
एकसंबा आज राजकीय हेडक्वाॅटर बनले असले तरी या दोन्ही कुटुंबाभोवतीच राजकारण फिरत राहिले आहे. सामान्य कार्यकर्त्यांना मोठी संधी मिळाली नसल्याची खंत येथे दुसऱ्या फळीतील नेते उघडपणे बोलून दाखवितात. हुक्केरी व जोल्ले दोघेही नेते राजकारणात हळुहळु वरचढ ठरले आहेत. प्रकाश हुक्केरी यांनी ग्रामपंचायत ते खासदार असा प्रवास केला आहे. तर अण्णासाहेब जोल्ले यांनीही जिल्हा पंचायत सदस्य म्हणून राजकारणात एंट्री करून ते आता खासदार आहेत. आमदार गणेश हुक्केरी यांनीही जिल्हा पंचायत सदस्यापासून सुरूवात केली आहे. तर मंत्री शशीकला जोल्ले यांनी संघटनात्मक कार्यातून इथंपर्यंत मजल मारली आहे.
सत्ता कुठलीही असो...
हुक्केरी कुटुंबाचे राजकारण चिक्कोडी-सदलगा मतदारसंघापूरते मर्यादित होते. आता प्रकाश हुक्केरी यांच्या विजयाने त्यांचे कार्यक्षेत्र तीन जिल्हे झाले आहे. तर जोल्ले यांचा पहिल्यापासूनचा गट चिक्कोडी भागात असून दोनवेळा निपाणी मतदारसंघात विधानसभा जिंकल्याने त्यांचे दोन विधानसभा मतदारसंघ व लोकसभा मतदारसंघात गट तयार झाला आहे. दोन्ही नेत्यांनी स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले असून पक्षातही त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आहे. अनेकदा सत्ता परिवर्तनावेळी या नेत्यांवर समेटाच्या राजकारणाचा आरोप झाला असला तरी हे दोन्ही राजकीय शत्रू आहेत, हे स्पष्ट आहे. एकसंबा गावातील या नेत्यांमुळे सत्ता कुठल्याही पक्षाची आली तर महत्वाची पदे गावाला मिळणार, हे निश्चित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.