श्रीगोंदे : श्रीगोंद्यातील लिंबूउत्पादकांनी देशाची बाजारपेठ काबीज केली असली, तरी या शेतकऱ्याला कष्टाच्या तुलनेत हक्काचा आणि पुरेपूर मोबदला मिळत नाही. लिंबूउत्पादकांना एकाच छत्राखाली आणून लागवडीपासून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंत पुढाकार घेत आहोत. त्यासाठी काही हजार शेतकऱ्यांचा गट स्थापन करणार असून, लिंबाच्या कडू चवीचे आर्थिक गोडीत रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
उघडून तर बघा- "लई जोरात... बाळासाहेब थोरात..' गीतावर आमदारांनी धरला ठेका
तालुक्यातील लिंबूउत्पादक शेतकऱ्यांनी नुकतीच नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्मला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाची माहिती घेतली. फार्मचे संचालक विलास शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर श्रीगोंद्यात अशाच प्रकारची मोठ्या प्रमाणात गटशेती करण्याचा विचार असल्याचे "सकाळ'कडे सांगत नागवडे म्हणाले, की शेती परवडत नाही, ही चर्चा आता तरुणांनी मोडीत काढली आहे. आधुनिक पद्धतीने शेती करून बक्कळ पैसा कसा मिळवावा यासाठी विविध प्रयोग राबविले जात आहेत. श्रीगोंद्यात लिंबाचे क्षेत्र मोठे आहे. गटशेतीसाठी लिंबू हे प्रायोगिक तत्त्वावर पीक निवडले आहे. शेतकऱ्यांची खासगी कंपनी स्थापन करून त्याच्या माध्यमातून लिंबू शेती फुलविली जाईल.
सगळ्या शेतकऱ्यांना नफा वितरित
खते, औषधे आणि बाजारपेठ याचे नियंत्रण कंपनीकडे ठेवून सगळे शेतकरी मालक या तत्त्वावर हा प्रकल्प उभारणार असल्याचे सांगत नागवडे म्हणाले, की लिंबाला वर्षभर चांगला दर मिळत नाही. थंडीत दर कमी असल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही. त्या वेळी कंपनीच्या माध्यमातून शीतकरणगृहे उभारली जातील. चांगल्या दराच्या वेळीच लिंबू बाहेर काढून विक्रीला पाठवले, तर त्यातून चांगला नफा मिळेल. शिवाय लिंबातून दरमहा मिळणारे सगळे उत्पन्न शेतकऱ्याला न देता वर्षाच्या शेवटी कंपनीचा एकूण नफा काढून तो सगळ्या शेतकऱ्यांना वितरित करण्यावर भर दिला जाईल. लवकरच या प्रकल्पाची प्रत्यक्षात सुरवात होणार आहे.
उत्पन्न कसे मिळवावे याचे थेट ज्ञान
प्रकल्पात लिंबासोबतच डाळिंब, द्राक्ष व भाजीपाला याचेही सगळे नियोजन केले जाणार आहे. याच पिकांचे थेट विक्रीसह इतर उत्पादनेही कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार असून, त्यात सभासद शेतकऱ्यांचा थेट सहभाग राहील. तालुक्यातील प्रयोगशील तरुणांचे यात मार्गदर्शन घेऊन शेतीतून योग्य उत्पादन व उत्पन्न कसे मिळवावे याचे थेट ज्ञान दिले जाईल.
- राजेंद्र नागवडे अध्यक्ष, नागवडे कारखाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.