महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवरील निपाणीसारख्या गावात दळपाची गिरण चालवताना लेखन करणारे महादेव मोरे विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले.
Mahadev More Passed Away : आयुष्यभर एका असीम निष्ठेने लिहिणारे आणि मराठी साहित्यात स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण करणारे महादेव मोरे यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना अलीकडे चालताना वयोपरत्वे हातात वॉकर धरावा लागत असतानाही वयाच्या ८६ व्या वर्षांपर्यंत या लेखकाने अखंड साहित्यसेवा केली. कथा, कादंबरी, ललित गद्य अशा किमान ५० पुस्तकांच्या लेखनाबरोबरच वर्षभरात नवीन पाच पुस्तकांची भर घालताना त्यांनी आपल्या खास स्नेह्यांसाठी अर्पण पत्रिका मनःपूर्वक तयार केल्या. त्यामागे त्यांनी साहित्यनिर्मिती करताना स्वतः जपलेली धारणा आणि मूल्यांची बैठकच दिसते.