Election Results : बदललेल्या राजकीय भूमिकेचा शेट्टींना फटका 

Election Results : बदललेल्या राजकीय भूमिकेचा शेट्टींना फटका 
Updated on

शाहूवाडी - शाहूवाडी - पन्हाळ्याचे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघात राबवलेली प्रचार यंत्रणा धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी मोलाची ठरली, तर राजू शेट्टी यांची बदललेली राजकीय भूमिका व मतदारसंघाचा त्यांचा तुटलेला जनसंपर्क त्यांचे मताधिक्‍य घटण्यास कारणीभूत ठरला.

गतवेळी येथून सर्वाधिक म्हणजे तब्बल 42 हजार 980 मतांचे मताधिक्‍य शेट्टी यांना मिळाले होते. यावेळी मात्र ते त्यांना टिकवता आले नाही. आजच्या निकालाने शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच अधिक गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यापूर्वीच्या दोन वेळच्या निवडणुकीत मतदारसंघातील आजी-माजी आमदारांसह मातब्बर राजकीय गटांची ताकद राजू शेट्टी यांच्या विरोधात, तर सर्वसामान्य जनता शेट्टींच्या सोबत अशी अवस्था होती; मात्र गेल्या पाच वर्षांत शेट्टी यांचा मतदारसंघात तुटलेला संपर्क, न झालेली विकासकामे आणि साखरसम्राटांसोबत जाण्याचा त्यांनी घेतलेला राजकीय निर्णय मतदारांना रुचला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांच्या निवडणुकांमध्ये जिवाचे रान केले होते तेच शेतकरी यावेळी त्यांच्या विरोधात गेल्याची स्थिती आहे.

राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांनी आघाडी धर्म पाळत शेट्टी यांना मदत केली; पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. जनसुराज्यचे माजी आमदार विनय कोरे यांची भूमिका शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिली. 

मतदारसंघात गेली पाच वर्षे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड यांच्या आघाडीच्या विरोधात जनसुराज्यचे विनय कोरे व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांची आघाडी अशी राजकीय समीकरणे होती.

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका या आघाड्यांमार्फतच लढवल्या गेल्या; मात्र झालेल्या खासदाकीच्या निवडणुकीत दोन्ही गायकवाड शेट्टींच्या पाठीशी राहिले, तर सत्यजित पाटील पक्षाशी बांधील राहिले. कोरे यांनी सावध भूमिका घेत थेट सहभाग घेतला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हे सर्वच गट पक्षधर्म पाळणार की, पुन्हा स्थानिक आघाड्याच होणार, का आणखी नवी राजकीय समीकरणे उदयास येणार याबाबत आता मतदारसंघात जोरात चर्चा आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.