सांगली - ऑफिसला किंवा कॉलेजला जायची लगबग असते आणि नेमकं काही ना काही विसरतं आणि पुन्हा कामाच्या ठिकाणी आपण पिशवी चाचपडत बसतो. सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण पिशवी थोडी बाजूला ठेवली की चोरांची भीती. अगदी कामाच्या वेळी मोबाईलची बॅटरी उतरते आणि गोची होते. या साऱ्या अडचणी, समस्या नेहमीच्या दररोजच्या जगण्यातील. त्यावर मात करायची कशी हा सर्वांनाच पडलेला प्रश्न. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चमूने त्यावर मार्ग शोधायचा प्रयत्न केलाय.
त्यांनी बॅग बी (ब्लू टूथ ऑपरेटेड बॅग) ही जादूई पिशवी बनवलीय. संशोधनाच्या टप्प्यावरील ही बॅग भविष्यात व्यावसायिक हेतूने उत्पादन केल्यास अवघ्या चार-पाचशेत उपलब्ध होऊ शकेल. कसे आहे हे तंत्र? बॅग बी म्हणजे ब्लु टुथ ची सोय असलेल्या कोणत्याही मोबाईलद्वारे कार्यान्वित करू शकू, अशी ही नेहमीच्या वापरातील सॅक (पिशवी) आहे. या पिशवीत सर्वसाधारण वापरातील २६०० mAh वापरातील बॅटरी बसवलेली असेल. या पिशवीसाठी म्हणून ॲप विकसित केले आहे. जे आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केले जाईल. त्याद्वारे पिशवीचे नियंत्रण होईल. प्रत्येक कप्प्यात सेन्सर बसवले आहेत.
त्या त्या कप्प्यात नेहमीच्या वस्तू नसतील तेव्हा तिथल्या सेन्सरशी जोडलेले ‘एलईडी’ दिवे लागतील. ही पिशवी ॲपच्या मदतीने लॉकही करता येईल. जेव्हा तुम्ही काही मिनिटांसाठी बॅगपासून दूर जाणार असाल तेव्हा ॲपमधील ‘ॲन्टी थेप्ट’ मोड सुरू करा. तुमची पिशवी एखाद्याने जागेवरून हलवली तर गजर व्हायला सुरवात होईल. यातील बॅटरीच्या आधारे तुम्ही तुमचा मोबाईलही आवश्यक तेव्हा चार्ज करू शकाल. रात्री घरी आल्यानंतर बॅगेची बॅटरी पुरेशी चार्ज करून ठेवावी लागेल. ही बॅग शॉक किंवा अन्य कोणत्याही धोक्यापासून सुरक्षित आहे. पाणी आणि आगीपासून ही बॅग दूर ठेवणे गरजेचे आहे.
पुढचे संशोधन
महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील हृषीकेश निकम, सतीश गोसावी, ओंकार भट या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केलंय. त्यांना विभागप्रमुख डॉ. बी. जी. पाटील, प्रा. व्ही. बी. धर्माधिकारी, जे. एस. शेटे यांचे मार्गदर्शन मिळाले. ही मंडळी सध्या या पिशवीतील आणखी नव्या संशोधनासाठी आता प्रयत्नशील आहेत. सध्या अशा स्वरूपाच्या बॅगांसाठी हजार रुपयांपर्यंतची किट उपलब्ध आहेत. ते चारशे रुपयांपर्यंत उपलब्ध करून देता येऊ शकते. या किटचा आकार कमी करण्याचे पुढचे प्रयत्न असून या पिशवीतील बॅटरी सूर्यप्रकाशाद्वारे चार्जिंग केली जाऊ शकते. महिलांसाठी या पिशवीमध्ये काही सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयी करता येणे शक्य आहे. जसे अडचणीच्या प्रसंगात जवळच्या व्यक्तींच्या मोबाईलवर संदेश पाठवला जाण्याची सोय या पिशवीत असेल.
महाविद्यालयाच्यावतीने व्यावसायिक उत्पादन म्हणून अशी किट बाजारात आणण्यासाठी व्यावसायिकांशी आम्ही चर्चा करणार आहोत. यासाठी नागरिकांनी आम्हाला सूचना कराव्यात, असे आवाहन महाविद्यालयाचे संचालक डॉ. जी. व्ही. पारीषवाड यांनी सांगितले.
अधिक माहिती व सूचनांसाठी - vidhyadhar.dharmadhikari@walchandsangli.ac.in
http://y2u.be/9ZWeBam2Vzo या यु ट्युब लिंकवर बॅग बीचे प्रात्यक्षिक पाहता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.