Mahad MIDC: महाड स्फोटातील ८ मृतदेह आढळले ; ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करणार
Mahad Industrial Accident: महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘ब्ल्यू जेट हेल्थकेअर’ कंपनीत शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीमध्ये सात कामगार जखमी, तर अकरा बेपत्ता झाले होते. या बेपत्ता कामगारांचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून शुक्रवारी रात्रभर शोधकार्य सुरू होते.
दरम्यान, आज सकाळपर्यंत एकूण आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले. ते पूर्णपणे जळालेल्या स्थितीत आहेत. परिणामी, त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. त्यामुळे डीएनए चाचणी करण्यासाठी मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. अन्य बेपत्ता व्यक्तींचा अद्यापही शोध सुरू आहे.
‘ब्ल्यू जेट’ या कंपनीमधील रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने शुक्रवारी सात कामगार जखमी, तर अकरा कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले. याची माहिती मिळताच शुक्रवारी मध्यरात्री कामगारांच्या नातेवाईकांसह, ग्रामस्थांनी गर्दी केली.
शनिवारी सकाळी एनडीआरएफच्या हाती ११ जणांपैकी आठ जणांचे मृतदेह लागले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडचे प्रांत ज्ञानोबा बाणापुरे, तहसीलदार महेश शितोळे, कारखाना सुरक्षा विभाग अधिकारी काटमवर आदींनी नातेवाईकांशी चर्चा केली.
मृतदेहाची जनुकीय चाचणी (डीएनए टेस्ट) करून ते संबंधित वारसदारांच्या ताब्यात देण्यात येतील, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीकडून मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी तीस लाख रुपये, तर मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये व प्रत्येकी मिळणारी विम्याची रक्कम अशी एकत्रित आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे यावेळी गोगावले यांनी सांगितले. सोबतच या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.(Latest Marathi News)
स्फोटाची सविस्तर माहिती अदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. दुर्घटनेतील मृत कामगारांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचा तत्काळ लाभ देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या योजनेंतर्गत प्रतिबालक दरमहा २ हजार २५० रुपये परिपोषण अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात.
दोषींवर कठोर कारवाई : उदय सामंत
स्फोटाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या नातेवाइकांना जास्तीत जास्त मदत देण्याची ग्वाही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी मदत कार्याचाही आढावा घेतला.(Latest Marathi News)
शिफ्ट बदलली आणि...
स्फोटात दगावलेला आदित्य मोरे याने ३ नोव्हेंबरला असलेली आपली सेकंड शिफ्ट बदलून फर्स्ट शिफ्ट मागून घेतली. शिफ्ट बदलणे त्याची मोठी चूक ठरली. तीन महिन्यांपूर्वी कामाला लागलेल्या आदित्य मोरेचे एम.एस्सी. (विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी) होण्याचे स्वप्नदेखील अपूर्ण राहिले आहे.
महाड शहराजवळ असणाऱ्या चोचिंदे गावातील आदित्य नुकताच बी.एस्सी. झाला. त्याचे वडील एका औषध दुकानात कामाला आहेत. आपले काम सांभाळत एम.एस्सी. पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न होते. शुक्रवारी कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये ११ कामगारांचा मृत्यू झाला. यामध्ये आदित्यचादेखील समावेश आहे. आदित्यच्या मृत्यूमुळे चोचिंदे गावामध्ये शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.