Sangli : जन आरोग्य योजनेतून लाखांवर रुग्ण आयुष्यमान

'महात्मा फुले', 'प्रधानमंत्री' योजना
Mahatma Phule
Mahatma Phulesakal
Updated on

सांगली : राज्य आणि केंद्र सरकारच्या जन आरोग्य योजनेमुळे जिल्ह्यातील एक लाख १८ हजार ९०२ रुग्ण ‘आयुष्यमान’ झाले असून त्यांचे उपचाराचे ४६६ कोटी ९६ लाख रुपये वाचले आहेत. मात्र, पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत देणाऱ्या ‘ई-गोल्डन कार्ड’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख २६ हजार ७७० लाभार्थी येत असले तरी अवघ्या ३१ टक्के लाभार्थ्यांनीच गोल्डन कार्ड घेतले आहे.

दोन योजना एकत्र

महाराष्ट्र शासनाची ‘महात्मा जोतिराव फुले’ व केंद्र शासनाची ‘प्रधानमंत्री’ या दोन जन आरोग्य योजना एकत्रितरित्या महाराष्ट्रात राबविल्या जात आहेत. या योजनेंतर्गत लाखो लोकांनी मोफत उपचार घेतले आहेत.

जिल्ह्यातील ३८ रुग्णालये संलग्न

या जन आरोग्य योजनेसाठी जिल्ह्यातील ३८ रुग्णालये संलग्न आहेत. यामध्ये पाच रुग्णालये शासकीय असून ३३ खासगी आहेत. यात विविध आजारांवर उपचार देणारी मल्टिस्पेशलिटी रुग्णालयेही आहेत. तर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, विटा आणि कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय; तसेच इस्लामपूर आणि कवठेमहांकाळ येथील आरोग्य उपकेंद्रे या योजनेत समाविष्ट आहेत.

‘ई-गोल्डन कार्ड’ला अल्प प्रतिसाद

शासनाने पाच लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी लाभार्थ्यांना ‘ई-गोल्डन कार्ड’ योजना सुरू केली आहे. यामध्ये लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड दिले जाते. त्यामुळे ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत त्यांना उपचार घेताना या कार्डाचा उपयोग होतो. लाभार्थ्यांनी हे कार्ड घेण्यासाठी प्रशासन सतत आवाहन करीत आहे, तरीही एकूण लाभार्थ्यांच्या केवळ ३१.१५ टक्क्यांनी हे कार्ड घेतले आहे.

‘ई-गोल्डन कार्ड’साठी विशेष मोहीम

जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात लाभार्थ्यांनी या योजनेंतर्गत गोल्डन कार्ड घ्यावे, यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. १५ जूनपासून आजवर या मोहिमेत २५ हजार लाभार्थ्यांनी कार्ड घेतले आहे, तर एकूण एक लाख ६४ हजार ८८ लाभार्थ्यांनी आजअखेर हे कार्ड घेतले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच लाख २६ हजार ७७० लाभार्थी आहेत.

उपचारांसह शस्त्रक्रियांचा समावेश

जन आरोग्य योजनेंतर्गत आजवर एक लाख १८ हजार ९०२ रुग्णांचे ४६६ कोटी ९४ लाख ५९ हजार ६४० रुपये वाचले आहेत. विशेषकरून कर्करोग, नेत्रविकास, लहान मुलांच्या आजारांसह वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे.

किती आजारांचा समावेश?

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ आजारांचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय संरक्षण मिळते, तर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ आजारांचा समावेश आहे. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी दीड लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपयांची तरतूद केली आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका, फोटो ओळखपत्र व जन आरोग्य योजनेसाठी ‘आयुष्यमान कार्ड’ची आवश्यकता आहे.

कोणत्या सुविधा मिळतात?

या योजनेमध्ये उपचारपूर्व तपासण्या, वैद्यकीय उपचार, प्रत्यारोपण साहित्य, शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, जेवण निःशुल्क उपलब्ध आहे. उपचारांनंतर परतीचा प्रवासखर्च योजनेंतर्गत दिला जातो.

गंभीर आजारांसाठी पाठपुरावा सेवा

या योजनांतर्गत हृदय शस्त्रक्रिया, मूत्राशयाचे आजार, हाडाचे विकार, फुफ्फुसाचे विकार, कर्करोग अशा गंभीर १८३ उपचारांसाठी पाठपुरावा सेवादेखील मोफत दिली जाते.

जन आरोग्य योजनांमुळे गोरगरिबांना गंभीर आजारांवरही मोफत उपचार मिळत आहेत. परंतु एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत ‘ई-गोल्डन कार्ड’धारकांची संख्या कमी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपले कार्ड काढून घ्यावे आणि आरोग्य सुरक्षित करावे.

- डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.