'या' ठिकाणी महाविकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला... 

mahavikas aaghadi creat new formula in Kolhapur Zilla Parishad
mahavikas aaghadi creat new formula in Kolhapur Zilla Parishad
Updated on

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व सभापतींचा कार्यकाल हा एक वर्षाचा राहणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी साधारण 22 महिने बाकी आहेत. हा कालावधी दोन पदाधिकाऱ्यांमध्ये समान करण्यात येईल. ठरलेल्या वेळेत हे सर्व पदाधिकारी राजीनामा देतील व या जागेवर नवीन पदाधिकारी नियुक्‍त केले जातील, अशी माहिती महाविकास आघाडीचे नेते गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. शुक्रवारी सर्किट हाउस येथे जिल्हा परिषद सभापती निवडीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, सत्याजीत पाटील, अरुण नरके, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे 41 सदस्य उपस्थित होते. 

बैठकीत टोलेबाजी

यावेळी बोलताना ना.पाटील म्हणाले, जिल्हयाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास या महत्वाच्या खात्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे सदस्यांना मोठ्या प्रमाणात विकास कामांना निधी मिळणार आहे. कागल तालुक्‍याचा यापुर्वीच विकास झाला आहे. त्यामुळे आता कागलकडे लक्ष न देता उर्वरीत जिल्ह्याकडे लक्ष दयावे, असा टोला ना.पाटील यांनी लावताच सभागृहात हशा पिकला. यावेळी ना.पाटील यांनी करवीर पंचायत समितीसाठी नविन इमारत बांधण्यासह जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे काम पूर्ण करण्याची मागणीही केली. 

बैठकीचे आभार मानताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, यावेळचे जिल्हा परिषद सदस्य हे नशीबवान आहेत. त्यांना हसन मुश्रीफ यांच्यसारखा काम करणारा नेता ग्रामविकास मंत्री म्हणून लाभला आहे. या संधीचा सर्व सदस्यांनी लाभ घेवून मतदार संघात विकासकामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा परिषद सदस्याच्या मतदार संघात किमान 10 वर्षे एकच आरक्षण ठेवण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी सदस्या स्वरुपाराणी जाधव यांनी केली. 

सदस्य जाणार गोव्याला 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक 2 जानेवारीला झाली. आता 16 तारखेस बांधकाम, शिक्षण, महिला बालकल्याण, समाजकल्यास समिती सभापतींची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सदस्यांची आज ना.मुश्रीफ, ना.पाटील, गा.मंडलिक यांच्या उपस्थितीत सर्किट हाउस येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर सदस्यांना सहलीवर रवाना करण्यात आले. शुक्रवारी हे सदस्य गगनबावडा येथे मुक्‍काम करणार असून शनिवारी ते गोव्याला जाणार आहेत. 

मागील सरकारने वैयक्‍तीक लाभार्थ्यांसाठी खात्यावर थेट पैसे जमा करण्याची (डीबीटी) योजना आणली आहे. मात्र या योजनेत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे ही योजना रदद करण्याची मागणी पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी केली. यावर डीबीटी हा विषय फक्‍त कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नाही. हा सर्व राज्याचा विषय आहे. त्यामुळे याबाबत योग्य निवेदन तयार करुन, सर्वांशी सल्लामसलत करुन ही मागणी करावी, अशी सुचना ना.पाटील यांनी यावेळी केली. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.