Maratha Reservation : 'आता सत्तेत घुसून मराठा आरक्षण घेऊ, जीव गेला तरी मागं हटणार नाही'; जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange-Patil : 'आपल्याला आपल्या पोरांचे भले करायचे आहे. जीव गेला तर चालेल; पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.'
Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-Patilesakal
Updated on
Summary

'पक्ष आणि नेता मोठा करण्यात आपल्या पाच पिढ्या गेल्या. आता जातीला मोठं करायची, समाजाची अस्मिता टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. जीव गेला तरी आरक्षणापासून हटणार नाही.'

सांगली : आपल्या लेकरांना आरक्षणाशिवाय (Maratha Reservation) पर्याय नाही. त्यामुळे मराठ्यांना रग आणि धग दाखवायची वेळ आली आहे. समाजाचे एकास एक उमेदवार देऊन सत्तेत घुसू आणि आरक्षण घेऊ. आपल्याच नाही, तर सगळ्या जातीधर्माचा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवू. फक्त तुम्ही पक्ष, नेता सोडा आणि जातीसाठी एकनिष्ठ राहा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी केले.

सकल मराठा समाजाच्यावतीने येथे जरांगे-पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली झाली. सोलापूरहून सांगली जिल्ह्यात काल दुपारी रॅलीचे आगमन झाले. मिरजेतून विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत दुचाकीवरून रॅली काढली. तेथून राम मंदिर चौकात रॅलीचे सभेत रूपांतर झाले. हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Manoj Jarange-Patil
Kini Toll Naka : टोल 'फ्री' मिळेना! आता वाहनधारकांना प्रत्येक महिन्याला द्यावे लागणार 315 रुपये, काय आहे कारण?

जरांगे-पाटील यांचे राम मंदिर चौकात जल्लोषात स्वागत झाले. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जरांगे-पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी महिलांनी जिजाऊ वंदना म्हटली. त्यानंतर सभेस सुरुवात झाली.

जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘आरक्षण दिले नाही, तर विधानसभेला २८८ आमदार तुमचे नसणार, असा इशारा दिला. त्यांना फक्त पक्ष, नेता मोठा करायचा आहे; पण मला माझी जात, पोरं मोठी करायची आहेत. मला तुमच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पाहायचा आहे. आरक्षण म्हणजे यांच्या बापाची जहागिरी नाही. आजवर ज्यांचे पक्ष, नेते मोठे केले, मुले मोठी केली त्यातील कुणी आरक्षणाबाबत बोलत नाही.’’

Manoj Jarange-Patil
Keshavrao Bhosale Theatre Fire : कलाकार, तंत्रज्ञांच्या अश्रूंचा बांध फुटला; माहिती देताना हुंदके, हृदयच जळून खाक झाल्याच्या भावना

२९ ऑगस्टला ठरणार पाडायचे की उभे करायचे

जरांगे म्हणाले, ‘‘येत्या २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत देशातील मराठ्यांची सर्वांत मोठी बैठक होईल. १३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा, नाही तर २९ ऑगस्टच्या बैठकीत ठरणार विधानसभेला पाडायचे की उभे करायचे. त्याला सर्वांनी उपस्थित राहा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले. गाफील राहू नका. आता नेत्यांची मुले नाहीत, तर सामान्य, गरीब मराठा कुटुंबातील मुलगा आमदार होईल. त्याला उमेदवारी दिली, तर विरोध करू नका. त्याच्या पाठीशी ठाम उभे राहा. मतदानादिवशी कोणीही घरात बसायचे नाही, तीर्थयात्रा, देव दर्शनाला जायचे नाही. बनावट मतदार यादीतून बाहेर काढायचे. आपल्याला आपल्या पोरांचे भले करायचे आहे. जीव गेला तर चालेल; पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. लढाई आपल्याला जिंकायची आहे. पक्ष आणि नेत्याला साथ देऊ नका. त्यांचा नाद सोडून साथ द्या.’’

हक्काचा माणूस विधानसभेत नाही

ते म्हणाले, ‘‘एकट्या छगन भुजबळ यांनी विधानसभेत आवाज उठवला; मात्र आपले शे-दीडशे असूनही काय उपयोग नाही. बोलायला हक्काचा माणूस नाही. मी रस्त्यावर लढायला तयार आहे. तुम्ही जर विधानसभेत ५० जरी गेलात तर त्यांचा कार्यक्रम होईल. त्यामुळे सगळ्या पक्षातील मराठा नेत्यांनी एकत्र या आणि आरक्षण मिळवून द्या. आरक्षणाचा विषय सहज घेऊ नका. भावनिक होऊ नका. अशी गरिबांची लाट कधी येणार नाही. त्यामुळे मराठ्यांनी गावेच्या गावे जागी करावीत.’’

सांगलीकरांची निष्ठा अन् कडवटपणा सिद्ध

गेल्या अकरा महिन्यांपासून आरक्षणाच्या लढाईसाठी राज्यभर फिरतोय. मात्र, आज सांगलीकरांनी निष्ठा आणि कडवटपणा सिद्ध केला आहे. हायवेवर भरपावसात महिला आणि समाजबांधव माझी वाट पाहात उभे होते. हे मी पहिल्यांदाच अनुभवल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले. यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, संयोजकांसह हजारो मराठा बांधव उपस्थित होते.

Manoj Jarange-Patil
Keshavrao Bhosale Theatre : कोल्हापूरचा मानबिंदू केशवराव भोसले नाट्यगृह भीषण आगीत बेचिराख; नेमकं काय घडलं अन् कशामुळं लागली आग?

जातीसाठी निष्ठावान राहा

पक्ष आणि नेता मोठा करण्यात आपल्या पाच पिढ्या गेल्या. आता जातीला मोठं करायची, समाजाची अस्मिता टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. जीव गेला तरी आरक्षणापासून हटणार नाही. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. जातीसाठी, पोरांसाठी निष्ठावान राहा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी आज केले.

सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांना भरपाई द्या

सांगली आणि कोल्हापूरमध्ये नुकताच महापूर आला होता. त्यामुळे शेतकऱ्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना करतो, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले. आलमट्टी धरणामुळे पूर येतो. आंदोलन संपू दे, तेथे जाऊ आपण. पाणी साठवताहेत ते आणि आमच्या डोक्याला ताप झालाय. आता आलमट्टीकडे बघायचंय, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.