नेमेचि येतो पावसाळा आणि पावसाळा संपल्यावर रस्त्यावरील खड्डे! महाराष्ट्रात आज कुठेही गेलात तरी रस्त्यांवरील खड्डेच स्वागत करतात. सातारा जिल्हा त्याला अपवाद कसा असेल? खड्ड्यांचे राजकारण आणि खड्ड्यांचे अर्थकारण बळकट होते, तेव्हा विपुल खड्ड्यांचे दर्शन होते, हे गणित आपल्याइतके कुणालाच जमत नाही. अगदी सुंदर वाटणाऱ्या चंद्रावरही खड्डे दिसतात. मग, आपल्या रस्त्यावर तर हवेच आहेत ना? खड्ड्यांशिवाय आपले जीवन अधुरेच आहे, असे साऱ्या लोकप्रतिनिधी आणि रस्ते बांधणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटत असावे. त्यामुळेच दरवर्षी रस्त्यांवर खड्डे कसे पडतील, याची विशेष दक्षता घेतली जात असावी. रस्ते चांगले राहिले तर वाहने सुसाट धावतील, अपघाताची शक्यता असते. या साऱ्या गोष्टी ध्यानात घेऊन प्रतिबंधात्मक काळजी घेतली जात असावी. दळणवळणाच्या सोयी-सुविधा चांगल्या झाल्या तर सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीला हातभार लागेल... वगैरे गोष्टी या काळजीपुढे तुच्छ आहेत म्हणूनच लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची सांगड त्यांचे रस्ते सुंदर बनण्यासाठी उपयोगी ठरतात.
रस्ते बनविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाल्याच्या बातम्या आपण वाचतो. ग्रामपंचायतीपासून आमदार, खासदारांपर्यंत सर्वांकडूनच रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून घेतला जातो. वेळोवेळी रस्त्यांसाठी निधी आणल्याचे दावे-प्रतिदावेही होत असतात. वर्षभरातील या निधीची आकडेवारी एवढी मोठी असते की, ते कोटीचे आकडे वाचताना सामान्यांच्या छातीवर प्रेशर आल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांसाठी निधी आणण्यात आपले लोकप्रतिनिधी इतके तत्पर असल्याचे पाहून उर भरून येतो. पण, कुठे तरी माशी शिंकते. माशी शिंकण्यामुळे रस्ते कितीही चांगले झाले तरी रस्त्यावर खड्डे पडण्याची प्रक्रिया सुरू राहते. छोट्या गावातील रस्ता असो की, शहरातील खड्डे पडण्याची समानता सगळीकडे सारखीच असते. विविधतेतून एकता की काय म्हणतात ते रस्त्यांवरील खड्ड्यांनी सिद्ध केले आहे. ही माशी शिंकण्याचे जे प्रकरण आहे ते नेमके काय असते, हेही सर्वांना माहिती असते. लोकप्रतिनिधींपासून रस्त्यांची कामे करणारे अधिकारी, ठेकेदार यांच्या साखळीने ठिकठिकाणी या माश्या पेरून ठेवलेल्या असतात. कोट्यवधींचा निधी खर्च करताना योग्य ती काळजी घ्यायला लागतेच ना? त्यामुळे निधीपैकी किती रक्कम कामासाठी वापरायची आणि इतर सर्व वाटेकऱ्यांची किती, याची गणिते रस्ता मंजूर व्हायच्या आधीच पक्की झालेली असतात. त्यामुळे ठेकेदाराच्या हातात काम येते, त्यावेळी उरलेल्या रकमेतून तो सुंदर रस्ता बनवितो. सुरवातीला चांगला गुळगुळीत असणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांची नक्षी तयार करण्याचे काम रस्ता बनवितानाच होत असते, हे सामान्यांच्या लक्षात कधीच येत नाही. बरं, पाणी आणि डांबर यांच्यात मोठे वैर असते. त्यात अधिकारी, ठेकेदार यांचा काय दोष? गुळगुळीत डांबरावरील छोटे छिद्र असले तरी पाण्याचे फावते. पाऊस पडला तर पाण्याची ताकद डांबर गिळायला सुरवात करते आणि बघता बघता छिद्राचे रूपांतर खड्ड्यात व्हायला लागते. कमी खर्चात भागवायचे असेल तर ही कार्यपद्धती अंगिकारली जाते, त्यात दोष कुणाचाच नसतो. पावसाळा संपला की खड्ड्यांची तीव्रता जाणवायला लागते. मग, लोकांची नाहक ओरड सुरू होते.
खड्ड्यांमुळे कसा त्रास होतो, याची रसभरीत वर्णनेही वाचायला मिळतात. कुणाच्या कंबरेला त्रास होतो तर कुणाचे मणके सरकतात. एरवी सर्व लोक आपापल्या कामात मग्न असतात. कामातून त्यांना धड विश्रांतीही मिळत नाही. कंबर, मणके दुखू लागले की आपोआप रजा- सुटी घेणे भाग पडते. त्यांनी विश्रांती घ्यावी एवढी काळजी दुसरे कोण घेते का? ही साखळीच त्यांची काळजी घेते म्हणूनच त्यांना विश्रांती मिळू शकते. त्याशिवाय डॉक्टर, दवाखाने कसे चालायचे, ही चिंताही ते नकळत दूर करीत असतात. दरवर्षी रस्ता तयार करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहही होतो. खड्डे पडल्यामुळे किती घटकांना लाभ होत असतो, हे लक्षात येत नाही, हा सामान्य लोकांचा दोषच आहे.
डांबर ही काळ्या रंगाची वस्तूही काही जणांचे कल्याण करणारी असते, यावर विश्वास बसत नसेल. पण, ते खरं आहे. आपल्याकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदारांची भट्टी इतकी चांगली जमलीय की, दरवर्षी खात्रीशीररित्या रस्त्यावर खड्डे पडण्याची किमया व्यवस्थित साधली जाते.
खरं म्हणजे अमेरिका वगैरे काही देश प्रगत समजले जातात. तिकडे म्हणे रस्त्यावर खड्डेच पडत नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तिथे रस्ते असे तयार केले जातात की तिथे पाच-दहा वर्षे खड्डेच नाहीत. काय कामाची ती प्रगती? एवढे तंत्रज्ञान सुधारले तरी ते अद्यापही मागासच आहेत. रस्त्यावर खड्डे पाडून लोकांची काळजी घेणारी आपल्याकडील साखळी किती भक्कम आहे, हे एवढ्याच उदाहरणावरून लक्षात येईल. त्या प्रगत म्हणवणाऱ्या देशांप्रमाणेच आपल्याकडेही तंत्रज्ञानाचा उपयोग करून चांगले टिकाऊ रस्ते तयार करता येतीलही. पण, ही सारी साखळी डांबरात इतकी घट्ट रूतली आहे की, त्यांच्या तंत्रज्ञानापुढे बाकी सगळे तंत्रज्ञान टुकार ठरते. त्यामुळे दरवर्षी नव्याने रस्ते व्हायला हवेत. त्यावर दरवर्षी चढत्या क्रमाने खड्डे पडले पाहिजेत. माणसे आणि वाहनांची तब्येत खराब होऊन त्यांना विश्रांती मिळाली पाहिजे. हे खड्डेपुराण अखंड चालले पाहिजे.
|