MLA Vilasrao Jagtap : विलासरावांची पक्षाला सोडचिट्टी, एकमताने विशाल यांना पाठिंबा

पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ मी फुलवले. पक्षाची ताकद वाढविली. याची दखल न घेता वरिष्ठ पातळीवर पक्ष आमच्या विरोधात गट निर्माण करत आहे.
MLA Vilasrao Jagtap
MLA Vilasrao Jagtapsakal
Updated on

जत - पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ मी फुलवले. पक्षाची ताकद वाढविली. याची दखल न घेता वरिष्ठ पातळीवर पक्ष आमच्या विरोधात गट निर्माण करत आहे. अशी तीव्र भावना व्यक्त करत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत विशाल पाटील यांना एकमताने मदत करण्याचा ठराव आज स्वाभिमानी कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला.

शिवाय, माजी आ. विलासराव जगताप यांच्यासह तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्राम जगताप, जत शहराध्यक्ष आण्णा भिसे, राजू डफळे, लक्ष्मण बोराडे, राजू चौगुले आदींसह जगताप समर्थकांनी आपले सामूहिक राजीनामे देत संजय पाटील यांना यंदा धडा शिकविण्याचा एकमुखी निर्णय झाला.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खासदार संजय पाटील व विलासराव जगताप यांच्यातील मतभेद विकोप्याला गेला होता. खा. संजय काका यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत व गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप श्री. जगताप यांच्यासह गटाने त्यांच्यावर केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये ऐक्य होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली. त्याचे पडसाद आता लोकसभेच्या या निवडणुकीत दिसून येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी पुढील दिशा ठरविण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. प्रत्येक जिल्हा परिषद गटातून जगताप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंकलेचे पुंडलिक दुधाळ, मराठा सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष ऍड. रणधीर कदम, अचकनहळळीचे प्रमोद सावंत, बनळीचे आबासाहेब सावंत, शेगावचे लक्ष्मण बोराडे, माडग्याळचे विष्णु चव्हाण, संख आर. बी. पाटील, राजू चौगुले, ज्याल्याळ राजू डफळे, दरिबडचीचे आनंदाराव पाटील, डफलपूरचे सुनील छत्रे, बिळुरचे बसगोंडा जाबगोंड, जत शहर आण्णा भिसे, अंकले शंकर वगरे, उमदीचे सुनील पोतदार, बनाळी मिलिंद पाटील, सिंगनहळळीचे हिप्परकर, पालक्ष लोणी, गौतम ऐवळे, संतोष मोठे, गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्ते बोलताना म्हणाले, काँग्रेसच्या बालेकिल्ला असताना भाजपचा आमदार निवडून आणला. तळागाळात भाजपची फळी निर्माण केली. शिवाय, अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या पदावर संधी दिली. ते पदाधिकारी आपल्या स्वार्थासाठी साहेबाना सोडून संजय पाटील यांना साथ देत आहेत.

त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी जरी साथ सोडली असली तरी कार्यकर्ते जगताप साहेब यांच्या पाठीशी राहील. कट्टर जगताप समर्थकांनी साहेब घेतील ते धोरण.. बांधतील ते तोरण म्हणत.. पाठिंबा दिला. या धोरणामुळे खा. संजय पाटील यांना जत मधून मताधिक्य घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही......

खासादरकीच्या तिकिटासाठी मी नागपूरला गेलो. त्यावेळी कोणी खा. संजय पाटील यांच्या सोबत नव्हते. मी यांच्यासाठी प्रयत्न केले. आता आम्हाला पक्षातून बाजूला करणे व आमचे खच्चीकरण करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आम्ही मोठ्या ताकतीने कार्यकर्ते घडवून त्यांना मोठ्या पदावर संधी दिली. त्यांना फोडण्याचे काम खा. पाटील यांनी केले. आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केले.

आज आ. गोपीचंद पडळकर, डॉ. रवींद्र आरळी, जि. बँ. चे संचालक प्रकाश जमदाडे, तम्मनगौडा रवि पाटील यांना आमदारकीचे गाजर दाखवून आपल्या बोटावर नाचवत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी कपटी राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना माझा राजीनामा दिला आहे.

शिवाय, गटातील कार्यकर्त्यांचा कल घेऊन येणाऱ्या लोकसभेला विशाल पाटील यांना एकमताने मदत करू, त्यांना मोठे मताधिक्य तालुक्यातून देण्याचा प्रयत्न करू. लवकरच दुष्काळी फोर्म गट विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मैदानावर उतरेल, अशी भूमिका माजी आ. विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.