चारशे वर्षांनंतर गुरु-शनि महायुतीचा सोमवारी नजारा 

Monday view of Jupiter-Saturn alliance after four hundred years
Monday view of Jupiter-Saturn alliance after four hundred years
Updated on

सांगली : येत्या सोमवारी (ता. 21) सायंकाळी पश्‍चिम आकाशात सूर्यमालेतील गुरु आणि शनि या सर्वात महाकाय ग्रहांमध्ये घडणाऱ्या यूतीचा सुंदर नजारा पाहायला मिळणार आहे. सुमारे चारशे वर्षांनंतर अशी खगोलीय घटना घडणार आहे. पश्‍चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा गुरु ग्रह 21 डिसेंबरला शनी ग्रहाच्या शेजारी उभा असेल. त्यावेळी या दोन ग्रहांमध्ये केवळ 0.1अंश अंतर असेल. त्यामुळे ते दोन ग्रह वेगळे नसून एकच मोठी ज्योत असल्याचे भासेल. 

खगोल अभ्यासक शंकर शेलार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 397 वर्षांपूर्वी 16 जुलै 1623 रोजी म्हणजे गॅलिलिओच्या काळात असा आविष्कार घडला होता. त्यानंतर तो आता 21 डिसेंबरला घडत आहे. नंतर असा नजारा पाहण्यासाठी 2080 सालापर्यंत वाट पहावी लागेल. गुरु ग्रह पृथ्वीपेक्षा 13 पट मोठा असून 78 कोटी किलोमीटरवरून सूर्याभोवती 11.86 वर्षात एक फेरी मारतो. शनिग्रह पृथ्वीपेक्षा 9.5 पट मोठा असून 143 कोटी किलोमीटरवरुन सूर्याभोवती 29.5 वर्षात एक फेरी पूर्ण करतो. या दोन बाह्यग्रहांची यूती 19 वर्ष व 7 महिन्यांनी घडते. हे दोन्ही ग्रह एकरुप झालेले दिसण्यासाठी हे ग्रह आणि पृथ्वी सरळ रेषेत यावे लागतात. हा योग दुर्मिळ असतो तो येत्या सोमवारी साधणार आहे. म्हणून त्यास "महायूती' असे म्हणतात. 

हा आविष्कार पाहण्यासाठी कोणत्याही साधनाची, उपकरणाची गरज नाही. 21 डिसेंबरला सायंकाळी सूर्यास्तानंतर लगेचच पश्‍चिमेला पहा. क्षितिजावर सुमारे 25 अंश उंचीवर ठळठळीत, तेजस्वी असा गुरु -शनि महायुतीचा सुंदर नजारा आपले लक्ष वेधून घेईल. ज्यांच्याकडे द्विनेत्री, दुर्बिण असेल त्यांनी ती जरूर वापरावी. एकाच फिल्डमध्ये दोन महाकाय ग्रह पाहण्याची आणि फोटोग्राफी करण्याची ही दुर्मीळ संधी आहे.

सध्या पश्‍चिमेला ठळक असा गुरु, तर त्याच्या वर वीतभर अंतरावर मंदप्रभ शनि दिसत आहेत. त्यांच्यातील अंतर रोज थोडे कमी होऊन 21 डिसेंबरला त्यांची महायूती घडेल. ग्रहांच्या चालीचं सुक्ष्म निरिक्षण करण्याचा कालावधी 18 ते 23 डिसेंबर दररोज सायंकाळी असा आहे. "महायूतीचा' हा खगोलीय आविष्कार पहा आणि या अलौकिक घटनेचे प्रत्यक्षदर्शी व्हा असे आवाहन श्री. शेलार यांनी केले.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.