सांगली : खासदार संजय पाटील यांनी भाजपशी फारकत आणि पक्षांतराशी निगडित चर्चांना ‘निव्वळ वावड्या’ म्हणत भाजप सोडणार नसल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या साक्षीने केली. गेल्या आठवड्यात ते दिल्लीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते. त्याआधी पाच राज्यांचे निकाल लागले. त्यामुळे संजयकाकांचा मूड बदलला असावा का, अशीही चर्चा आहे.
जिल्ह्यात अपवाद वगळता बहुतांश भाजप नेत्यांशी उभा दावा मांडलेल्या संजयकाकांनी पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी सलोखा राखला आहे. पुढील लोकसभेला अजून वेळ आहे, मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत त्यांना ‘मी भाजपचा’हे सिद्ध करण्यासाठी हाती ‘कमळ’घेऊन अग्निपरीक्षा द्यावी लागेल. इकडे संजयकाकांना वगळून पुढची दिशा ठरवत असलेल्या भाजप नेत्यांची मात्र पुरती पंचाईत झाली आहे.
‘मी निवडणुकीपुरता पंधरा दिवस भाजपचा असतो. इतर काळात मी कुठल्या पक्षाचा नसतो, जो काम घेऊन येतो, त्याचे मी काम करतो’,असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी म्हणाले होते. त्यांची ही भूमिका विकासात राजकारण असता कामा नये, अशी मार्गदर्शक होती. संजयकाकांचा ‘पॅटर्न’ही या वाक्याच्या जवळ जाणारा आहे, मात्र त्यांची दिशा गोंधळात टाकणारी आहे. ते निवडणुकीच्या काळात भाजपचे असतात, मात्र त्यानंतर त्यांची सलगी इतर सर्व पक्षांशी होते, फक्त भाजप वगळून, अशी भाजप नेत्यांची तक्रार आहे.
संजयकाकांना ‘मी भाजपचाच’हे पुन्हा-पुन्हा सांगण्याची वेळ का येते, हे समजून घेण्यासाठी त्यांच्या भाजप प्रवेशापर्यंत मागे जावे लागते. त्यांचा भाजप प्रवेश २०१४ साली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. भाजपांर्गत विरोध मोडून काढत ते विक्रमी मताधिक्याने लोकसभा जिंकले. त्यानंतर काही काळ ते भाजपचे जिल्ह्याचे नेते झाले. पुढे पक्षाच्या राज्य ‘शीर्ष’नेतृत्वाशी खटके उडायला लागले. त्यातून त्यांनी जिल्हा परिषदेला ‘कमळ’बाजूला ठेवले. त्यातून अंतर वाढत गेले आणि २०१९ उजडेपर्यंत त्यांच्या विरोधात प्रमुख नेत्यांची एक फळी उभी राहिली. मोठी खटपट करून तडजोड झाली, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. ते दुसऱ्यांदा खासदार झाले. त्यासाठी माजी आमदार विलासराव जगतापांनी पुढाकार घेतला, मात्र जगतापांनाच त्यांनी दुखावले. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जगताप ही यादी कमी होती, तोवर महापालिका निवडणुकीतील गोंधळाच्या भूमिकेमुळे आमदार सुधीर गाडगीळ; तर मिरज पंचायत समितीत अधिक लक्ष घातल्याने आमदार सुरेश खाडे यांच्याशी त्यांचा शीतसंघर्ष सुरू झाला.
तासगाव, यशवंत कारखान्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या ते जवळ गेल्याचे लपून राहिले नाही. पुढील लोकसभा निवडणुकीआधी ते पक्षांतर करतील, असेही बोलले जाऊ लागले. हे गृहीत धरून भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत त्यांच्या विरोधात भाजपने पॅनेल लावले. जिल्हा बँकेला काकांची इच्छा नसताना भाजपने पॅनेल उतरवले. जिल्हा परिषद अध्यक्ष बदलात त्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीला काका वगळून तयारी सुरू झाली होती, तोवर त्यांनी ‘मी भाजपचा’,असे जाहीर केले.
इकडे आभाळ फाटले असताना तिकडे संजयकाकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मात्र सलोख्याचे संबंध वाढवण्यावर भर दिला. आता योग्य संधी साधून फासे टाकले. राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये आऊटगोईंग वाढले आहे. एकेका नेत्यावर राष्ट्रवादीने गळ टाकला आहे. अशावेळी संजयकाका पक्षात राहणे भाजपसाठी फायद्याचे ठरू शकते, मात्र त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा, याबाबत जिल्हातील नेते तूर्त गोंधळात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय रहाते, यावर पुढीच दिशा ठरेल. तोवर संजयकाकांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चांना पूर्ण नाही, मात्र स्वल्पविराम मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.