‘‘महिलांत अनेक सुप्त गुण आहेत; परंतु काही कारणांमुळे त्यांच्या या गुणांना वाव मिळत नाही. शहरी भागातील महिलांना काही प्रमाणात संधी मिळते, पण ग्रामीण भागातील महिला अद्यापही पारंपरिक रुढी-परंपरांत अडकलेल्या आहेत; मात्र यात आमूलाग्र बदल होत आहे. त्या महिलांत जनजागृती होत आहे. शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, स्वयंरोजगार याकडे महिला वळत आहेत. ही बाब चांगली आहे. महिलांच्या सुप्तगुणांना वाव मिळाल्यास खूप मोठा बदल घडेल,’’ असा विश्वास सखी मंच अध्यक्षा, पेठवडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी व्यक्त केला.
विद्याताई म्हणाल्या, ‘‘महिला स्वतंत्र आहेत का? आधुनिक युग आले असे आपण म्हणतो तसे खरेच झाले आहे का? पोशाख, राहणीमान उंचावल्यातर त्या विचाराने समृद्ध झाल्या का? हे प्रश्न आहेत. महिलांनी विचारांनी समृद्ध व्हायला हवे. त्यासाठी त्यांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. त्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचे म्हणजे भ्रूणहत्या या स्त्रियांच्या मानसिकतेमधूनच होतात. मुलगा, मुलगी यांच्यात भेद करून चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यासाठी त्यांचे आचार, विचार बदलले पाहिजे. त्यांच्यात सहनशीलतेचा अभाव दिसून येतो. म्हणूनच सासू-सून यांच्यामधील वाद होऊन कुटुंब व्यवस्था बिघडते.’’
त्या म्हणाल्या, ‘‘पतीच्या नोकरीनिमित्त बहुतांश वेळ मुंबई, पुण्यात गेला. आजोबा, वडिलांची आई यांची सामाजिक पार्श्वभूमी होती. त्यामुळे समाजकारणाची आवड निर्माण झाली. वडगाव शहरात स्थायिक झाले. त्यानंतर महिलांशी संपर्क आल्यानंतर महिलांना स्वावलंबी बनवणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यासाठी सर्वप्रथम महिलांना संघटित करण्यासाठी कल्याणी संखी मंचची स्थापना केली.
त्यातून प्रशिक्षिण शिबिर घेऊन महिलांना प्रशिक्षित केले. त्यांनी केलेल्या उत्पादनास बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे होते. त्यासाठी महिला महोत्सवास सुरवात केली. या तीन दिवसांच्या महोत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध पदार्थांना बाजारपेठ मिळवून देऊन त्यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण केले. या तीन दिवसांच्या कालावधीत अनेक चित्रपट कलाकारांना बोलावून, विविध कार्यक्रम घेऊन महिलांना प्रेरित करण्याचे काम केले. याच पद्धतीने पापडनिर्मिती, मसाले, चटणी, लोणची उत्पादन सुरू केले. त्यातील अनेक उत्पादने परदेशात पाठवली. कल्याणी बझारच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळवून दिले.’’
त्या म्हणाल्या, ‘‘कल्याणी सखी मंचच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाते. महिलांच्या आरोग्यासाठी व्याख्यान, आरोग्य शिबिर भरवून त्यांची काळजी घेतली जाते. मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी हुशार व गरीब विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची व्यवस्था शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करतो. नेमबाज अभिज्ञा पाटीलसाठी खास शूटिंगरेंज तयार केले. महिलांना उद्योगासाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून भागभांडवल दिले जाते. महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळवून देण्यासाठी दरमहा एक कार्यक्रम हमखास घेतलाच जातो.’’
विद्याताई पोळ सांगतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.