कोल्हापूर - १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याला गुरुवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत; मात्र या लढ्यातील स्वातंत्र्यवीरांची महाराष्ट्रात उपेक्षाच सुरू आहे. साताऱ्यातील प्रतिसरकारचे राष्ट्रीय स्मारक अनेक वर्षांपासून कागदावरच आहे; तर प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित चित्रपटाला १० वर्षांपासून निधीच मिळालेला नाही.
क्रातिसिंहांच्या किल्ले मच्छिंद्रगड येथील स्मारकात क्रांतिसिंहाच्या कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफीत
अथवा साहित्य उपलब्ध नाही. स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठवाडा मुक्ती संग्राम, तसेच समाज परिवर्तनासाठी आयुष्य वाहिलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा विसर पडल्याचेच दिसते.
१९४२ चा लढा हा स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास. सातारा-सांगली भागात सत्यशोधक चळवळीतून नाना पाटील यांनी समविचारी तरुणांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा उभारला. या लढ्याच्या माध्यमातून नाना पाटील व सहकाऱ्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. प्रतिसरकार उभारून समांतर शासन व्यवस्था उभी केली होती. स्वातंत्र्य मिळण्याआधीच सातारा-सांगली स्वतंत्र झाले होते. नाना पाटील यांनी ब्रिटिशांवर जरब बसली होती. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्नांची शिकस्त केली.
गिल्बर्ट नावाच्या अधिकाऱ्याकडे नाना पाटील यांना पकडण्याची जबाबदारी सोपविली होती. मात्र नाना पाटील कधीच सापडले नाहीत. समाजकंटक, उपद्रवी लोंकांचा बंदोबस्त करण्यासाठी नानांनी ‘तुफान सेना’ उभारली होती. नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या धर्तीवर पश्चिम बंगालमधील मिदनापूर, बिहार राज्यातील बलिया जिल्ह्यातही प्रतिसरकार सुरू झाले होते.
या प्रतिसरकारच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी मिदनापूर, बलिया, सातारा येथे प्रतिसरकाराचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी निधीची तरतूदही केली. मिदनापूर आणि बलिया येथे स्मारके उभी राहिली; मात्र साताऱ्यातील स्मारक अद्याप कागदावरच आहे. नाना पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २००० मध्ये राज्य सरकराने तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती नेमली होती.
या समितीच्या सातारा व सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांसोबत बैठकाही झाल्या. त्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही गोरगरीब, शोषितांसाठी आयुष्यभर लढत राहिलेल्या नाना पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांची महती आजच्या पिढीला समजावी यासाठी त्यांचे चरित्र प्रकाशन, त्यांचे उचित स्मारक व्हावे, त्याच्या नावे टपाल तिकीट काढले जावे आदी मागण्या करण्यात आल्या. त्यातील काहींची चरित्रे प्रकाशित झाली.
टपाल तिकीट, साताऱ्यातील राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मात्र अद्यापही प्रलंबितच आहे. नाना पाटील यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रपटाची स्क्रिप्ट १० वर्षांपासून तयार आहे. कामेरी (ता. वाळवा) येथील विलास रकटे यांनी ती लिहिली आहे. त्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर अर्थसाह्यासाठी प्रयत्न केले; मात्र कोणीही त्यासाठी पुढे आले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.