सांगली : कोविडच्या महामारीच्या काळात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्रीच्या पोस्ट सध्या समाजमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत. वस्तुतः असं मुलांना दत्तक देता वा घेता येत नाही. अशा प्रकारांमागे काही दृष्टप्रवृत्ती असू शकतील. त्यामुळेच प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मुळात ही प्रक्रिया लक्षात घ्यायला हवी.
कोरोना महामारीचे अनेक अनुषांगिक दुष्परिणाम पुढे येत आहेत. त्यात बालकांविषयीच्या आधीच्याच समस्या अधिक टोकदारपणे पुढे येत आहेत. दोन्ही पालकांच्या मृत्यू मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा नातलगांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे. बालकांवरील अत्याचाराच्या तक्रारी आहेत. या संकटाचा काही समाजकंटकही फायदा उठवत आहेत. ते अशा अनाथ परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे चित्र समाज माध्यमांवरील पोस्टवरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबुक, व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.
भावनात्मक आवाहन करून ही बालके दत्तक देण्यासाठी उपलब्ध असल्याचे चित्र चित्र निर्माण केले जात आहे. हा प्रकार म्हणजे परस्पर दत्तक घेणे-देणे वा खरेदी-विक्री केली करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, 2015 तसेच दत्तक नियमावली, 2017 नुसार त्याच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. असे प्रकार करणारे किंवा त्यात सहभागी असणाऱ्यांवर मानवी तस्करी केल्याप्रकरणी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
दत्तक घेण्याआधीचे नियम-निकष
- देशांतर्गत आणि परदेशातही दत्तक प्रक्रिया ‘कारा’च राबवते.- आधी संस्थेमार्फत इच्छुक पालकांची सर्वांगीण पात्रता तपासणी होते.
- इच्छुक दांम्पत्यांच्या वयाची बेरीज ११० पेक्षा कमी हवी.
- एकल पालकत्व असलेल्या महिलेस मुलगा-मुलगी दोन्ही दत्तक घेता येते.
- एकल पालकत्व असलेल्या पुरुषाला फक्त मुलगाच दत्तक घेता येतो
अशी होते दत्तक प्रक्रिया...
केंद्र सरकारने दत्तक प्रक्रिया राबवण्यासाठी कारा (सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स एजन्सी) या संस्थेमार्फतच संपुर्ण प्रक्रिया राबवली आहे. ती प्रक्रिया पुर्णतः ऑनलाईन असते. सांभाळण्यास असमर्थ असणे, अनौरस संतती किंवा मातृपितृ छत्र हरवल्याने निराधार झालेले अर्भक-बालक आढळल्यास ते जिल्हा बाल कल्याण समिती किंवा निराधार संस्थेकडे सोपवली जात असतात. अशा मुलांच्या दत्तक प्रक्रियेसाठी बाल कल्याण समिती, संबंधित संस्था कायदेशीर प्रक्रिया राबवून ती मुले दत्तक देण्यासाठी म्हणून संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात. देशभरातील या सर्व संस्थांमधील अशी दत्तक मुलांची माहिती ‘कारा’ मार्फत पालकांना दिली जाते. त्यासाठी पालकांनी कारच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल केल्यानंतर संस्थामार्फत संबंधित पालकांची आर्थिक क्षमता, वय याचा विचार करून पुढील प्रक्रिया राबवली जाते. आणि अंतिमतः न्यायालयाच्या देखरेखेखाली दत्तक प्रक्रिया पुर्ण केली जाते.
?सांगली जिल्ह्यातील संस्था
कर्ण बाल संगोपन केंद्र, घनश्यामनगर, सांगली
येथे नवजात अर्भक ते सहा वर्षे वयोगटातील निराधार, निराश्रीत, एकल पालकांच्या बालकांचा स्वीकार, सांभाळ आणि पुनर्वसनाचे काम होते.
दादूकाका भिडे मुलांचे निरिक्षणगृह, सौ.सुंदरबाई मालु मुलींचे निरिक्षण गृह
निराधार झालेली, कुटुंबाकडून सांभाळ अशक्य असलेली तसेच काही चुकीच्या वर्तनामुळे न्यायालयाच्या आदेशाने सहा ते अठरा वयोगटातील मुलांना सुधारण्याची संधी देण्यासाठी या संस्थेत ठेवले जाते. मुलांसाठी भिडे निरिक्षणगृह तर मुलींसाठी मालू निरिक्षणगृह आहे.
भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, सांगली
संस्थेच्या वतीने महिलांसाठी विविध स्वरुपाचे काम चालते. त्यापैकी यशवंतनगर येथे एचआयव्ही बाधित पालकाच्या बालकांसाठीचे पुनर्वसन केंद्र आहे. तेथेच महिलाश्रम असून तेथे निराधार महिलांना आधार व स्वावलंबनासाठी काम चालते. संस्थेच्यावतीने देवदासी मुलींचे सहा ते अठरा वयोगटातील मुलींसाठी जत येथे स्वतंत्रपणे काम चालते.
डॉ. न. रा. पाठक अनाथाश्रम, मिरज
येथे नवजात शिशू ते सहा वर्षे आणि सहा ते अठरा वर्षे या वयोगटातील बालकांचा स्वीकार, सांभाळ आणि पुनर्वसनाचे कार्य होते.
शासकीय मुलींचे बालगृह, मिरज
येथे सहा ते अठरा वयोगटातील मुलींचा स्वीकार, सांभाळ आणि पुनर्वसनाचे काम चालते.
"जिल्हा टास्क फोर्सची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत महामारीमुळे अनाथ-निराधार बालकांची माहिती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अशा मुलांसाठी शासन स्तरावर कशी मदत देता येईल यासाठीही प्रयत्न आहेत. कोणालाही परस्पर दत्तक प्रक्रिया राबवता येणार नाही. तसे प्रकार समजले असल्यास नागरिकांनी १०९८ किंवा स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सीशी ८३२९०४१५३१ या क्रमांकावर माहिती द्यावी."
- बापूसाहेब खोत, बाल संरक्षक अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.