सोलापूर : तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर सोलापुरातील दाजी पेठ येथील श्री वेंकटेश्वर देवस्थानम् येथे सोमवारी (ता. 6) वैकुंठ एकादशीनिमित्त पहाटे पाचपासून भाविकांचे उत्तरद्वार दर्शनासाठी आगमन होत होते. रात्री 11 पर्यंत सुमारे एक लाख भाविकांनी "गोविंदाऽ गोविंदाऽऽ'च्या गजरात "श्रीं'चे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानम्चे अध्यक्ष जयेंद्र द्यावनपल्ली यांनी दिली.
रात्री 11 पर्यंत भाविकांची गर्दी
वैकुंठ एकादशीनिमित्त पहाटे साडेपाच वाजता "श्रीं'ची पालखी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आली. तेथे लावण्यात आलेल्या आरशात "श्रीं'ना त्यांचे प्रतिबिंब दाखविण्यात आले. तेथून मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. यानंतर "श्रीं'च्या मूर्ती मंदिरात विराजमान झाल्या. दिवसभर शहरातील मारवाडी, गुजराती, पूर्वभागातील नागरिकांसह कर्नाटक, मराठवाडा यासह जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत होते. जवळपास 30 ते 40 हजार भाविक दर्शन घेतील असा अंदाज देवस्थानम् समितीचा होता; मात्र रात्री 11 पर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम होती अन् सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
दर्शनासाठी मंदिराभोवती धर्मदर्शन व स्पेशल दर्शन रांगेची सोय केली होती. सकाळी व दुपारच्या मानाने सायंकाळच्या सुमारास भाविकांची गर्दी वाढली होती. रात्री नऊच्या दरम्यान गर्दी इतकी वाढली की गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस व स्वयंसेवकांची धांदल उडाली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व प्रसादाचे वाटप करण्यासाठी 300 महिला व पुरुष स्वयंसेवक तैनात होते. दर्शनानंतर भाविकांना फळे, पुलिहोरा भात, दहीभात, साबूवडा, केशर भात, शिरा प्रसाद वाटप करण्यात आला.
हेही वाचा - सोलापूरचे मंत्रिपद हुकले, आता लक्ष महामंडळाकडे
या मंडळांनी केली सेवा अर्पण
वैकुंठ एकादशीनिमित्त मंदिरात गीता फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी विष्णू सहस्रनाम पठण केले. तसेच विश्व मध्व महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी "श्रीं'च्या गीतांवर टिपरी व नृत्यसेवा सादर केली. तसेच पूर्व भागातील स्वयंसेवी महिलांनी प्रसाद वाटप व दर्शनरांगेतील भाविकांना मार्गदर्शन करण्याची सेवा केली. "हॅपी थॉट्स'तर्फे भाविकांना "विचार नियमचा आधार आशा आणि विश्वास' पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
शिबिरात 143 जणांनी केले रक्तदान
वैकुंठ एकादशीनिमित्त देवस्थानम् समोरील बालाजी उद्यानात देवस्थानम्तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोल्ली रक्तपेढी व दमाणी रक्तपेढीतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. दोन्ही रक्तपेढ्यांमध्ये एकूण 143 दात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह, व्हीआयपी दर्शन पास व प्रसाद म्हणून लाडू देण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर वैकुंठ एकादशीनिमित्त उत्तरद्वार दर्शनाचा सोहळा सोलापुरातही आयोजित केला जातो. या दिवशी 33 कोटी देवता भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी येतात, अशी आख्यायिका आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे 30 ते 40 हजार भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज होता; मात्र या वर्षी सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
- जयेंद्र द्यावनपल्ली, अध्यक्ष, श्री वेंकटेश्वर देवस्थानम्
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.